चतुरंग खेळाडू
विदित गुजराथीनंतर अहमदनगरचा शार्दुल गागरे याने उत्तर महाराष्ट्रातला दुसरा, तर भारतातला ४२ वा ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवला. एरव्ही अन्य खेळांमध्ये खोऱ्याने आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होत असतीलही, पण बुद्धिबळात ग्रँडमास्टर होण्यासाठी अनेकांना दहा वर्षांपेक्षा जास्त काळ घालवावा लागतो. वयाच्या १८ व्या वर्षी हा बहुमान मिळवल्याने त्याचे कौतुकच आहे.
काही वर्षांपूर्वी जळगावात फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा होती. त्या वेळी एक लहानसा मुलगा अनुभवी ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसेंसोबत खेळत होता. डाव चुरशीचा होता. ठिपसे प्रचंड दबावाखाली खेळत होते, तर त्या लहानग्या मुलाच्या चेहऱ्यावर तणावाचा लवलेशही नव्हता. ठिपसेंच्या चेहऱ्यावर घर्मबिंदू चमकत होते. अर्थातच तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. ते विचारांती चाल करायचे नि हा चिमुरडा क्षणात त्यांना उत्तर द्यायचा. विशेष म्हणजे या लहानग्या मुलाला खुर्चीवर बसून खेळता येत नव्हते. उभा राहून खेळायचा. हा डाव पाहण्यासाठी पटाभोवती मोठी गर्दी जमली. ठिपसेंचा डाव कोसळला होता, पण अनुभवाच्या जोरावर ते तग धरून होते. मात्र, अखेर ते हरले. तो लहानगा मुलगा जिंकला. हा मुलगा दुसरातिसरा कोणी नाही तर अहमदनगरचा शार्दुल गागरे होता. वेगवान चाली रचणारा हाच चुणचुणीत मुलगा आता वयाच्या १८ व्या वर्षी नुकताच ग्रँडमास्टर झाला आणि हा बहुमान मिळविणारा उत्तर महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला.
भारतीय बुद्धिबळ महासंघाची (एआयसीएफ) स्थापना १९५१ मधील. या ६५ वर्षांत महासंघाकडे आतापर्यंत ५० हजारपेक्षा अधिक अधिकृत खेळाडू रजिस्टर आहेत. या ६५ वर्षांच्या प्रवासात भारतात केवळ ४२ ग्रँडमास्टर होऊ शकले. एरव्ही अन्य खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू होणे म्हणजे एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणे एवढेच समजले जाते. तो राखीव होता का, त्याची कामगिरी काय होती असले प्रश्न कधी पडत नाहीत. बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळला तरी त्याला आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल. त्याचे आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग काय, त्याची कामगिरी काय असे नाना प्रश्न उपस्थित होतात. म्हणूनच बुद्धिबळातील कोणतीही कामगिरी ही त्या खेळाडूच्या गुणवत्तेवरच मोजली जाते. ग्रँडमास्टरचा बहुमानही असाच आहे. त्याचे निकषही इतके कठीण आहे, की अनेकांना आंतरराष्ट्रीय मास्टरचा बहुमान मिळाल्यानंतरही ग्रँडमास्टरची पात्रता पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागली आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे पहिले आणि भारतातील दुसरे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे. राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेची सात वेळा विजेतीपदे मिळवली असली तरी ठिपसे वयाच्या ३८ व्या वर्षी १९९७ मध्ये ग्रँडमास्टर झाले. विश्वनाथन आनंदनंतर त्यांनी हा बहुमान मिळविला. शार्दुल गागरे याचे कौतुक याचसाठी आहे, की ग्रँडमास्टरपर्यंतचा प्रवास सोपा मुळीच नाही. आंतरराष्ट्रीय मास्टरचा बहुमान मिळविल्यानंतर हा बहुमान मिळतो. अर्थात, आंतरराष्ट्रीय मास्टरचा बहुमान मिळवण्यासाठी तीन नॉर्म मिळवावे लागतात. त्यामुळे या नॉर्मच्या स्पर्धा भारतात फारशा होत नाहीत. आयएम झाल्यानंतरच जीएम नॉर्मसाठी कोणताही खेळाडू पात्र ठरतो. अर्थात, त्यासाठी फिडे रेटिंग किमान २५०० असावे लागते. रेटिंगचे निकष पार करण्यासाठी स्पर्धा खेळाव्या लागतातच, शिवाय नॉर्म मिळवायचा तर त्या आयएम, जीएम खेळाडूंचा सहभागही असावा लागतो. या खेळाडूंविरुद्ध गुण घेतले तरच जीएमचा एक नॉर्म निश्चित होतो. ग्रँडमास्टरचा नॉर्म झटपट मिळवायचा असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे विश्व बुद्धिबळ स्पर्धा जिंकणे. ती जिंकली तर थेट ग्रँडमास्टर होता येते!
शार्दुल गागरे याच्यापुढे दुसरा पर्याय खुला होताच. त्याने तिन्ही नॉर्म जिंकले तरी तो जीएम होऊ शकणार नव्हता. कारण त्यासाठी २५०० चे रेटिंग असणेही आवश्यक होते. त्या वेळी त्याचे रेटिंग होते २४९७. जुलै २०१३मध्ये त्याने पहिला जीएम नॉर्म मिळवला. दोन वर्षांनंतर त्याने जुलै २०१५ मध्ये दुसरा नॉर्म मिळवला आणि यंदा जानेवारीत कतारमध्ये झालेल्या स्पर्धेत शार्दुल गागरे यानेतिसरा नॉर्मही मिळवला. एका नॉर्मसाठी किती झगडावे लागते हे शार्दुल गागरे याच्या या ग्रँडमास्टरच्या प्रवासावरूनच लक्षात येते. एका स्पर्धेचे शुल्क २५ हजार रुपयांपेक्षा अधिक असते. हे नॉर्म मिळवूनही त्याला २४९७ वरून २५०० रेटिंग मिळवावे लागणार होते. हे सर्वांत अवघड असते. रेटिंग मिळवण्यापेक्षा आहे ते टिकवून ठेवणे अवघड असते. जर कमी रेटिंग असणाऱ्या खेळाडूकडून पराभूत झालेच तर १५ ते २० गुणांचा फटका बसतो. सुदैवाने शार्दुलबाबत तसे काही झाले नाही. मुंबईतील एका स्पर्धेत त्याने २५०० चा पल्ला पार केला आणि शार्दुल बुद्धिबळातला सर्वोच्च ग्रँडमास्टरचा बहुमान मिळवला. शार्दुलच्या बुद्धिबळासाठी गेल्या आठ-दहा वर्षांत त्याच्या पालकांनी ५० लाखांपेक्षा अधिक खर्च केला आहे. आयएमचे स्वप्न बाळगणारे अनेक खेळाडू सध्या एका वर्षासाठी पाच ते दहा लाख रुपयांपेक्षा खर्च करीत आहेत.
बुद्धिबळात भारत
भारतात आतापर्यंत २० हजार १६३ खेळाडूंनी फिडे रेटिंग मिळवले आहे. मात्र, ग्रँडमास्टरची संख्या अद्याप ४० पेक्षा जास्त नाही. अवघे ४२ ग्रँडमास्टर भारतात आहेत. महिला ग्रँडमास्टर ७, तर ८९ खेळाडू आंतरराष्ट्रीय मास्टर (आयएम) आहेत. रशियात सर्वाधिक २२७ ग्रँडमास्टर आहेत. त्याखालोखाल जर्मनी ८३ ग्रँडमास्टर, युक्रेन ८२, अमेरिका ८५, सर्बिया ५४ या देशांचा क्रमांक लागतो. ही एकूण ग्रँडमास्टरची संख्या आहे. मात्र, क्रम अॅक्टिव्ह ग्रँडमास्टरनुसार आहे. यात भारताचा क्रमांक ११ वा आहे, तर सलग दोन वेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या मॅग्नस कार्लसनचा नॉर्वे देश ३२ व्या स्थानी आहे. मात्र, कमी ग्रँडमास्टर असले तरी गुणवत्तेनुसार भारत महिला आणि पुरुष गटात जगात पाचवा आहे. यात विश्वनाथन आनंद जगात आठव्या स्थानावर आहे, तर महिला गटात भारताची अव्वल खेळाडू कोनेरू हम्पी जगात दुसऱ्या स्थानावर आहे.
जगातील पहिले ग्रँडमास्टर
फिडेने दुसऱ्या महायुद्धानंतर ग्रँडमास्टरचा बहुमान सुरू केला. फिडेने १९५० मध्ये २७ खेळाडूंना थेट ग्रँडमास्टरचा बहुमान प्रदान केला. त्यात विश्वविजेता मिखाइल बोटविनिक, मिगुएल नॅजदॉर्फ आदी खेळाडूंचा समावेश होता. मात्र, विश्वविजेता स्टेनिट्झ, लास्कर, कॅपाब्लॅंका, अलेखाइन या दिग्गज खेळाडूंना हा बहुमान मात्र मिळू शकला नाही. कारण १९५० पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. १९५७ मध्ये जगात केवळ ५० ग्रँडमास्टर होते. त्या वेळी रशियात १९, युगोस्लाव्हियात ७, तर जर्मनीत अवघे दोनच ग्रँडमास्टर होते. १९७२ मध्ये जगातील एकूण ७७ पैकी एकट्या रशियाकडे ३३ ग्रँडमास्टर होते. आता जगभरात हजाराच्या वर ग्रँडमास्टर आहेत. जॉर्जियाची नोना गॅप्रिंडाश्विली जगातील पहिली महिला ग्रँडमास्टर, तर फिलिपिन्सचा युजिनियो टोरे हा आशियातला पहिला ग्रँडमास्टर आहे.
एकूणच ग्रँडमास्टरचा प्रवास सोपा नाही. जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या स्थापनेला ९० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. ग्रँडमास्टरचा बहुमान सुरू होण्यासही ६० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. याचा अर्थ ग्रँडमास्टरची संख्याही वाढायला हवी असे वाटणे साहजिक आहे. मात्र, त्याचे निकष सोपे नाहीत. या बहुमानापर्यंतचा मार्गच प्रचंड खडतर आहे. म्हणूनच ग्रँडमास्टर होणारा खेळाडू असामान्य म्हणूनच ओळखला जातो ते उगीच नाही. शार्दुलचे म्हणूनच कौतुक.
(Maharashtra Times, Nashik & Jalgaon : 8 Feb. 2016)
[jnews_hero_9 post_offset=”2″ include_category=”60″ sort_by=”latest_modified”]