गोष्ट सैराट (Sairat) शब्दाची…
सैराट शब्दावरून आठवलं… लहानपणी म्हणजे अगदी मराठी शाळेत असताना ‘झिंगाट’ हा शब्द बऱ्याचदा ऐकायचो आणि म्हणायचोही. उदा.. मी लई झिंगाट पळालो… वगैरे वगैरे.. त्यालाच आणखी एक पर्यायी शब्द भन्नाट असाही वापरायचो. पण हा शब्द आम्ही ‘भिनाट’ असाच म्हणायचो. लई भिनाट पळालो… नंतर कळलं, की तो भन्नाट या मूळ शब्दाचा अपभ्रंश आहे. असो. नागनाथ मंजुळेंच्या सैराट (Sairat) चित्रपटाने पुन्हा या बोली भाषेतील शब्दांची आठवण करून दिली. सैराट उत्तर महाराष्ट्राला काहीसा नवा वाटेल. कारण इकडे ‘झिंगाट’ शब्द वापरला जातो; पण पश्चिम महाराष्ट्रातील बोली भाषांमध्ये सैराट (Sairat) हा शब्द सहज उच्चारला जातो. सैराट म्हणजे वेगवान, झिंगाट, सुसाट असा आहे हे एव्हाना सैराट (Sairat) चित्रपटाने स्पष्ट केलं आहे.
मराठी भाषेतले रांगडे शब्द कमालीचे सुंदर असतात. सैराट हा शब्दही त्यातलाच. हा शब्द मूळचा पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बोली भाषेतला.
सैराट (Sairat) या शब्दाचा शोध घेताना लक्षात आलं, की हा शब्द आताचा मुळी नाहीच. संत तुकारामांनी तुकाराम गाथेत हा शब्द दोनदा वापरला आहे. (३८५ व ४२३ वा अभंग)
३८५
पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट ।
मागें सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजें ठेवुनि ललाट वो ॥१॥
४२३
पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय ।
खेटितां कुंप कांटी । खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥१॥
असो… बोली भाषांतील व्युत्पत्ती कशी झाली, याच्या खोलात आपण कधी जात नाही. काही ग्रामीण शब्द शिव्यांमध्ये रूपांतरित झाले आहेत. ‘झक मारणे’ हा त्यातचलाच एक. झक मारणे म्हणजे मासे मारणे असा त्याचा अर्थ असल्याचं मला नुकतंच कळलं. अर्थात, ‘झक’ याचा अर्थ मासे की माश्यांच्या प्रजातीचं नाव आहे की पक्षी आहे हे समजलं नाही. पण त्याचा साधासरळ अर्थ आहे हे नक्की. ती शिवी नाही. असो. नागनाथ मंजुळे यांच्या सैराट (Sairat)वरून हा सगळा शब्दप्रपंच सुचला.
नाशिकचे साहित्यिक फ्रान्सिस वाघमारे यांनी सैराट (Sairat) हे विशेषण असल्याची माहिती दिली. त्याचा अर्थ आहे, ‘आपल्याच धुंदीत असलेला, उद्दिष्ट साध्य करण्याच्या नशेत परिणामांची तमा न बाळगणारा, धोकादायक वेगाने- जीव धोक्यात घालून सुसाट निघालेला’ असा आहे.
‘देशदूत’चे संपादक दिलीप तिवारी यांनी या शब्दाची माहिती देताना तो अहिराणीतही सहजतेने वापरला जात असल्याचे म्हटले आहे. (उदा. तो सर्राट थापा मारस भो … म्हणजे तो खूप, आगापिछा नसलेल्या, भरपूर थापा मारतो असा अर्थ होतो, तसेच तो सर्राट गाडी चालावस … म्हणजे तो काहीही न पाहता वेगात गाडी पळवतो असा अर्थ आहे.)
दिलीप तिवारी ‘सकाळ’च्या खान्देश आवृत्तीचे संपादक असताना त्यांनी स्थानांतर आणि स्थलांतर या दोन शब्दांची माहिती दिली. हे दोन्ही शब्द एक नाहीत. मुळात स्थलांतर हा शब्द सर्रासपणे वापरला जातो. मात्र, विदर्भातील वृत्तपत्रांत स्थानांतर असा शब्दही वाचायला मिळाला. तिवारी यांनी ‘सकाळ’च्या अकोला आवृत्तीतही काम केलेले असल्याने त्यांनी स्थानांतर आणि स्थलांतर या दोन शब्दांच्या अर्थातली भिन्नता स्पष्ट केली. शहरांतर्गतच एखादे दुकान किंवा घर इतरत्र हलवायचे असेल तर तो जागेतला बदल असतो. म्हणून त्याला ‘स्थानांतर’ असे म्हणायचे. मात्र, एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे असेल तर तो स्थळातला बदल आहे. त्यामुळे त्याला ‘स्थलांतर’ असे म्हणायचे. मात्र, आजही स्थानांतर हा शब्द फक्त विदर्भातच वापरला जातो.
सैराट शब्दावरून सुचलेला हा शब्दप्रपंच….असे अनेक शब्द आहेत… त्यावर नंतर कधी तरी बोलूया.. आपल्याला अशाच काही शब्दांची माहिती असेल तर अवश्य नोंदवावी.
[jnews_block_27 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”111″]