क्वीन ऑफ काटवे
Queen of Katwe- Phiona Mutesi | बुद्धिबळाने तिचं आयुष्य बदललं. |
लपूनछपून पाहणाऱ्या या मुलीकडे प्रशिक्षकाचं लक्ष गेलं. त्याने तिला बोलावलं. ती घाबरली. तो म्हणाला, ‘‘घाबरू नकोस. तुला खेळायचं?’’ तिला त्या सुंदर आकारातल्या सोंगट्यांचं इतकं आकर्षण होतं, की ती लगेच हो म्हणाली. ही मुलगी होती फियोना मुटेसी Phiona Mutesi |.
वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत तिला लिहिता-वाचताही येत नव्हतं. तिची भाषा लुगांडा. लुगांडात बुद्धिबळाला काय म्हणतात हेही तिला माहीत नाही. नंतर तिला कळलं, की हा खेळ ‘चेस’ आहे.
काटवे म्हणजे युगांडातील आठव्या क्रमांकाची सर्वांत मोठी झोपडपट्टी. ही झोपडपट्टी म्हणजे बकाल वस्ती. मधूनच वाहणारी दुर्गंधीयुक्त काळ्याशार पाण्याची गटार, आजूबाजूला कचऱ्याचं साम्राज्य आणि त्यात वसलेली छोटी छोटी पत्र्याची, लाकडाची घरं. दुर्गंधी इतकी, की नाकाला रुमाल लावल्यानंतरही कुबट वास जाणार नाही. पावसाळ्यात या वस्तीतल्या नाल्यांना इतका पूर येतो, की या काळात प्रत्येकाचा घरातला मुक्काम छपरावर असतो. इथे ४० ते ५० टक्के अल्पवयीन मुली कुमारी माता आहेत. जर तुमचा जन्म काटवेत झाला असेल तर नक्कीच तुमचा मृत्यूही काटवेतच होईल. मग तो कदाचित एखाद्या भयावह आजाराने असेल किंवा हिंसाचाराने किंवा दारिद्र्याने तडफडून तरी! अशा झोपडपट्टीत फियोनाचा जन्म झाला. मात्र, तो कधी झाला याची नेमकी जन्मतारीख तिच्या आईलाही माहिती नाही.
फियोनाला वडिलांची आठवण विचारली तर ती सांगते, ‘‘मी अवघ्या तीन वर्षांची होते, तेव्हा वडिलांच्या गावी गेले होते. ते प्रचंड आजारी होते. आठवडाभरातच त्यांचा मृत्यू झाला.. त्यांना एड्स होता!’’ फियोनाच्या बालपणीच्या आठवणी सुन्न करणाऱ्या होत्या. ती म्हणते, ‘‘वडिलांच्या मृत्यूनंतर आम्ही काही आठवडे गावात थांबलो. एके दिवशी सकाळी मी उठले तेव्हा माझी मोठी बहीण मला म्हणाली, माझं डोकं फार दुखतंय. मी स्थानिक जडीबुटी आणून तिला दिली. नंतर ती झोपली. पुन्हा ती कधीच उठली नाही.’’
फियोनाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण नव्हतेच. जे होते ते असे. मृत्यू जवळून पाहिलेले!
फियोनाचं घर म्हणजे अवघ्या १० बाय १० फुटांची खोली, ज्याला एकही खिडकी नाही. जीर्ण झालेलं छत, जे प्रत्येक पावसात गळायचं. या छोट्याशा घरात धुणीभांडी करण्यासाठी एक मोठं पातेलं होतं. एक कोळशाचा स्टोव्ह, एक कपबशी, एक वापरलेला टूथब्रश, तडा गेलेला आरसा, एक बायबल आणि दोन कुबट वासाच्या गाद्या… ज्यावर फियोना, तिचे दोन भाऊ व आई हे अख्ख कुटुंब झोपायचं.
पितृछत्र लहानपणीच हरपलं. सगळी जबाबदारी आईवरच येऊन पडली. ते अशा वस्तीत राहत होते, जेथे चोऱ्याचपाट्या, लूटमार हेच आर्थिक स्रोत. जगण्यासाठी रोजचाच संघर्ष. ही वस्ती अशी होती, जेथे अनेकांना वडीलच माहीत नाहीत. अशा ठिकाणी फियोनाची आई मजुरी करायची. तरीही पुरेसं अन्न पोटात जात नव्हतं. लाकडी फळ्यांच्या घराचं भाडं देता देताच त्यांच्या नाकीनऊ यायचे. घरभाडं देता आलं नाही म्हणून त्यांना घर सोडावं लागण्याची नामुष्कीही ओढवली.
फियोना स्वतः मलेरियासारख्या आजारातून दोनदा वाचली. खर्च झेपत नाही म्हणून तिची शाळा वयाच्या नवव्या वर्षीच सुटली. घराला हातभार लावण्यासाठी तिलाही घराबाहेर पडावं लागलं. मक्याची उकडलेली कणसं ती दारोदार विकायची. एकदा तिचा लहान भाऊ बाहेर जाताना दिसला. ती त्याच्या मागे मागे गेल्यावर तिला तो काही तरी खेळताना दिसला. तिथं बरीच मुलं होती. त्यांना कोणी तरी चेस शिकवत होतं. मग फियोना कणसं विकून आली, की झोपडपट्टीतच एका व्हरांड्यात बुद्धिबळ खेळणारी मुलं ती लपूनछपून पाहायची.
युगांडात एक मिशनरी या मुलांना शिकवत होता. तो होता रॉबर्ट काटेंडे. हा काटेंडेही जवळच्याच झोपडपट्टीतला अनाथ मुलगा. त्याने फियोनाची उत्सुकता हेरली आणि तिला बुद्धिबळाचे धडे देण्यास सुरुवात केली. फियोना हळूहळू या खेळात इतकी रमली, की तिच्या आक्रमक चालींनी अनेक दिग्गजांचा ती काही वेळातच फडशा पाडायची. ती नवनव्या चाली आवडीने शिकायची. कदाचित ती आपल्याच समस्यांचं उत्तर शोधत असावी. अशी एखादी चाल असू शकेल, जी सगळ्या समस्यांचं उत्तर असेल. नंतर तिला बुद्धिबळ स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्या वेळी ती स्वतःला अतिशय कमी लेखायची. सगळी मुलं छान छान कपडे परिधान करून आलेली आणि फियोना त्यात अतिशय अजागळ दिसायची. मात्र, काटेंडेने तिला विश्वास दिला- ‘‘तू फक्त पटावर लक्ष दे.’’
बुद्धिबळात आपण लौकिक मिळवू असं तिला कधीही वाटलं नव्हतं. मात्र, हीच फियोना युगांडाची तीन वेळा राष्ट्रीय ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली. २०१२ मध्ये तिने ‘वुमेन कँडिडेट मास्टर’चा बहुमान मिळविला. असा बहुमान मिळविणारी ती युगांडातील पहिली महिला खेळाडू ठरली. सुदानमध्ये २००९ मध्ये ज्युनिअर गटातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फियोनाची प्रथमच निवड झाली. या स्पर्धेच्या निमित्ताने फियोना प्रथमच काटवेच्या बाहेर पडली होती. आयुष्यात प्रथमच ती विमानात बसली. विमानाने आकाशी झेप घेतली आणि निळेशार वायुमंडल पाहून फियोना चमकली. तिच्या शेजारी युगांडाचा बुद्धिबळ पदाधिकारी बसला होता. ते निळे आकाश पाहून तेरा वर्षांची फियोना त्यांना म्हणाली, ‘‘हे स्वर्ग आहे का?’’
फियोना प्रथमच एका आलिशान हॉटेलमध्ये थांबली. प्रथमच स्वतंत्र मऊ बिछान्यावर झोपली. खूप वेळ शॉवरने अंघोळीचा आनंद लुटला. मुलायम टॉवेलने अंग पुसले. तिने कल्पनाही केली नव्हती, की असं काही आपल्या वाट्याला येईल. तिच्यासाठी अकल्पनीय असं विश्व होतं. जणू काही मी राणी आहे, असं तिला वाटत होतं.
युगांडाच्या झोपडपट्टीतील ही तिघांची टीम स्पर्धेतील सर्वांत कमी वयाची होती. या तिघांनी कमालच केली. फियोनाने सर्वच डाव जिंकले. तिच्या संघातील अन्य दोघेही विजयी ठरले होते. स्पर्धेतील सर्वांत अनुभवी अशा १६ संघांमध्ये हे तिघे नवखे सर्वोत्तम ठरले आणि चॅम्पियनशिपही जिंकली. जेव्हा ते काटवेत परतले तेव्हा ते हिरो झाले होते. फियोनाला तर प्रश्न पडला, की ही जिंकलेली आकर्षक ट्रॉफी आता ठेवायची कुठे? कोणी चोरली तर?
त्यांना विचित्र प्रश्नही पडले. आपण जर ही ट्रॉफी घरातील झाडांमध्ये लपवून ठेवली तर? अरे यार, आपण परत का आलो? फियोनावर कौतुकांचा वर्षाव सुरू होता. तेव्हा कोणी तरी तिला प्रश्न विचारला, की तू तुझ्या आईकडे गेल्यानंतर तिला पहिल्यांदा काय विचारशील?
फियोना काळजीयुक्त स्वरांत म्हणाली, ‘‘मला खरंच तिच्याशी बोलावंसं वाटतंय, की तिला पुरेसं खायला मिळालं का?’’
सप्टेंबर २०१० मध्ये फियोना आणि तिचा प्रशिक्षक रॉबर्ट काटेंडे यांनी रशियाकडे कूच केले. जगातील सर्वांत प्रतिष्ठेच्या चेस ऑलिम्पियाडमध्ये ती युगांडाचे प्रतिनिधित्व करणार होती. ही स्पर्धा होती सैबेरियातील खांटी-मँसिस्कमध्ये. स्पर्धेत सगळे तिच्यापेक्षा वयाने किती तरी मोठे होते. तिला माहीत नव्हतं, की आपण या स्पर्धेत पात्र कसे ठरलो, ऑलिम्पियाड म्हणजे काय? तिने फक्त एकच भाबडा प्रश्न विचारला, ‘‘तिथे खूप थंडी असते का?’’
स्पर्धेत २० देशांतील संघ सहभागी झाले होते. त्यांना माहीत नव्हतं, की फियोना ही कुठून आलीय आणि तिला कुठे जायचंय. फियोना मात्र अशा ठिकाणाहून आली होती, की जिथे मुलींना आपली मते व्यक्त करण्याचा कोणताही अधिकार नाही. मात्र, फियोनाची एक लढत काटेंडेच्या स्मरणात कायमची कोरली गेली. इजिप्त संघाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात फियोना एका ग्रँडमास्टरविरुद्ध खेळत होती. हा डाव फियोना अतिशय पद्धतशीरपणे हरली आणि त्याच वेळी ती प्रशिक्षकाला म्हणाली, ‘‘कोच, काही दिवसांनी मीही ग्रँडमास्टर होईन.’’
रशियाचा दौरा आटोपून फियोना मायदेशी परतीच्या प्रवासाला निघाली. काही दिवसांसाठी पॅरोलवर सुटल्यानंतर कैद्याची पुन्हा जेलमध्ये रवानगी व्हावी, तशी ते रशियातून काटवेकडे परतत होती.
दोन वर्षांनंतर फियोना पुन्हा २०१२ मध्ये इस्तंबूलमध्ये चेस ऑलिम्पियाड खेळायला गेली. या स्पर्धेतून ती युगांडाची पहिली महिला कँडिडेट मास्टर झाली. तिच्या ग्रँडमास्टरच्या प्रवासातील हा पहिला टप्पा होता. नंतर तिने अमेरिकेत पहिलाचा दौरा केला. त्या वेळी तिच्यावर ‘द क्वीन ऑफ काटवे’ हे पुस्तक लिहिले गेले.
सुरुवातीला फियोनाला बोलताही येत नव्हतं. अर्थात, ती ज्या वस्तीतून आली होती, तिथे मुलींना स्वतःचे काही विचार असतात याची कल्पनाही नव्हती. काहीशी बुजरी, लिहिता- वाचता न येणारी फियोना नंतर अस्खलित इंग्रजी बोलू लागली. बालपण ते किशोरावस्थेतील फियोनाचा हा प्रवास तिच्यासाठी अविश्वसनीय होता.
फियोना आता २४ वर्षांची आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर गेली आहे. बुद्धिबळविश्वात तिची कामगिरी खूप उंचावलेली नसेलही; मात्र युगांडासाठी, युगांडासारख्या गरीब देशांसाठी, झोपडपट्टीतल्या मुलांमध्ये आशेचा किरण जागविण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. ती युगांडातील मुलांना बुद्धिबळाचे धडे देत आहेत. यातूनच तिचा फियोना मुटेसी चेस क्लब उदयास आला. तिला ग्रँडमास्टर व्हायचंय.
बुद्धिबळात काळ्या आणि पांढऱ्या मोहऱ्या असतात. यात नेहमीच पांढऱ्या मोहऱ्यांना प्रथम खेळण्याची संधी असते. त्यामुळे जिंकण्याची संधीही पांढऱ्या मोहऱ्यांनाच जास्त असते. त्यामुळे गमतीने म्हंटलं जातं, की हा खेळ वर्णद्वेशी तर नाही? मात्र, बुद्धीचा कस दोन्ही बाजूंनी सारखाच लागतो. त्यामुळे काळ्या मोहऱ्यांनाही जिंकण्याची तितकीच संधी असते, जितकी पांढऱ्या मोहऱ्यांना. फियोनाने युगांडातील झोपडपट्टीतील मुलांमध्ये ही उमेद जागवली. फियोनाला पुढच्या काळात हार्वर्ड विद्यापीठात शिकण्याची इच्छा आहे. बुद्धिबळाने केवळ तिचं दारिद्र्य संपवलं नाही, तर मानाने जगण्याची उमेद दिली. तिच्या आयुष्यावरची ही चित्तरकथा आता हॉलिवूडच्या पडद्यावर आली आहे. फिल्म निर्देशक मीरा नायर यांनी तिच्यावर १०० कोटींचे बजेट असलेला ‘क्वीन ऑफ काटवे’ हा चित्रपट बनवला आहे. बॉबी फिशर, गॅरी कास्पारोव या जगज्जेत्यांवर, ग्रँडमास्टरवर आजवर अनेक चित्रपट पडद्यावर आले. त्यांच्या पंक्तीत फियोनाने स्थान मिळवले आहे. आयुष्यात समस्यांचा डोंगर आ वासून उभा असला तरी त्यावर मात करण्याची एक चाल पुरेशी असते. मात्र, ही चाल शोधावी लागते, जशी फियोनाने शोधली. फियोना आता सक्षम झाली होती. चौसष्ट घरांची राणी म्हणून यशस्वी ठरलेल्या फियोनाला हक्काचं घर नव्हतंच. घर नसल्याने काय हाल सोसावे लागले याची तिला जाणीव होती. आईला तिने वचन दिलं होतं, मी तुला हक्काचं घर घेऊन देईन. मुलीने आपलं वचन पूर्ण केलं. एका खेळाने तिचं आयुष्य बदललं. हा सगळाच प्रवास अविश्वसनीय होता. फियोना एक बुद्धिबळपटू म्हणून नाही, तर दुःखावर मात करणारी एक प्रेरणादायी खेळाडू म्हणूनच लक्षात राहते.
Plz visit my youtube channel