पी के बॅनर्जी : क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल रुजविणारा अवलिया
पी. के. बॅनर्जी P K Banerjee | गेले आणि भारतीय फुटबॉलवर शोककळा पसरली. क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल रुजविणारे पी. के. बॅनर्जी यांनी साठचं दशक गाजवलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने एका सामन्यात पेलेच्या संघालाही बरोबरीत रोखले होते. पीके कोण होते, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या समृद्ध कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाशझोत…
भारतात करोना विषाणूच्या संसर्गाने दस्तक दिली होती. अवघ्या विश्वाला या विषाणूने विळखा घातला होता. एकीकडे संपूर्ण जग करोनाशी झुंजत होते, तर दुसरीकडे भारतीय फुटबॉल संघातील माजी माजी कर्णधार पी. के. बॅनर्जी (प्रदीप कुमार बॅनर्जी) वयाच्या 83 व्या वर्षी घशाच्या संसर्गाशी लढा देत होते. अशातच ती नकोशी बातमी येऊन धडकली- पी. के. बॅनर्जी (Pradip Kumar Banerjee) गेले. क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉलचीही क्रेझ आणण्याचं स्वप्न पाहणारा एक तारा कायमचा अस्तंगत झाला.
कोलकात्यात जानेवारी 2020 मध्ये ते घशाच्या संसर्गाशी झुंजत होते. फेब्रुवारीत त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांना व्हेंटिलेटरवर (जीवरक्षा प्रणाली) ठेवण्यात आले. मैदानावर त्वेषाने खेळणारा भारताचा हा लढावू माजी कर्णधार शरपंजरी अवस्थेत अखेरच्या घटका मोजत होता. न्यूमोनियामुळे त्यांच्या शरीराचा एकेक भाग बंद पडत होता. पार्किन्सन, डिमेन्शिया आणि हृदयाशी संबंधित आजार अशा एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत होते. अखेर 20 मार्च 2020 रोजी रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पीकेंना दोन मुली आहेत. पाऊला आणि पूर्णा या त्यांच्या दोन्ही मुलींनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांचा लहान भाऊ प्रसून बॅनर्जी तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. बॅनर्जी परिवाराने वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. याच परिवारातले पीके यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदान उल्लेखनीयच म्हणावं लागेल. कारण ते अशा काळात फुटबॉल खेळत होते, ज्या काळात हा एक दुर्लक्षित खेळ होता. एकीकडे संपूर्ण विश्व फुटबॉलवेडं होतं, त्याच काळात भारताने क्रिकेटला कवटाळलं होतं. अशा प्रतिकूल स्थितीत पीकेंनी भारतीय फुटबॉलला आशिया खंडात उंचीवर नेऊन ठेवले होते. 1962 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने सुवर्णपदक जिंकले. त्याचे साक्षीदार पीके होते.
पी के बॅनर्जी यांचा फुटबॉल प्रवास
टिस्टा नदीकाठावर वसलेल्या जलपायगुडी जिल्ह्यातील मोयनागुडी येथे 23 जून 1936 रोजी पी. के. बॅनर्जी यांचा जन्म झाला. फाळणीनंतर ते जमशेदपूर येथे आले. पीकेंनी भारतासाठी ८४ सामने खेळले. यात त्यांचे ६५ गोल होते. भारतातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले पी. के. बनर्जी साठच्या दशकातील उत्तम खेळाडू होते. नंतर 70 च्या दशकात सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणूनही त्यांची कारकीर्द बहरली. ‘पीके’, प्रदीप ‘दा’ नावांनी परिचित असलेले पी. के. बॅनर्जी यांनी भारतीय फुटबॉलसाठी जे केलं, ते कुणीही विसरू शकणार नाही. त्यांनी दोन ऑलिम्पिक (मेलबर्न 1956, रोम 1960) आणि तीन आशियाई स्पर्धांमध्ये (१९५८, १९६२, १९६६) भारताचे प्रतिनिधित्व केले. एक खेळाडू म्हणून १९६२ मध्ये त्यांनी जाकार्ता आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आणि एक प्रशिक्षक म्हणून 1970 मध्ये बँकॉकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. त्यांची बरोबरी करू शकेल असा आज तरी कोणी नाही आणि भविष्यातही असा होऊ शकेल याची शक्यताही नाही. पीके केवळ खेळाडूच नव्हते, तर ते असे व्यक्ती होते, ज्यांनी बंगाली नागरिकांना आवडेल अशी प्रत्येक गोष्ट ओळखली होती. दुर्दैवाने, मैदानावरील त्यांच्या कारकिर्दीचा कोणताही व्हिडीओ अस्तित्वात नाही. मात्र, कल्पना करा, की आशियाई स्पर्धेतील जपान आणि दक्षिण कोरियासारख्या दिग्गज संघांविरुद्ध हा खेळाडू कसा गोल करीत असेल. सामन्याची स्थिती वाचण्याच्या क्षमतेमुळेच पीके 70 ते 90 च्या दशकातील भारतातील सर्वांत महान फुटबॉल प्रशिक्षकांपैकी एक होऊ शकले. ते भारताचे पहिले ‘फुटबॉल मॅनेजर’ होते. त्या वेळी हे पद तर अस्तित्वातच नव्हते.
”मला नाही वाटत, की कुणाच्या किकमध्ये एवढी ताकद असेल, जेवढी प्रदीपकडे होती. त्याचबरोबर सामन्याच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याची त्यांची क्षमता तर अद्भुतच.”
– चुन्नी गोस्वामी (पीकेंचे जवळचे मित्र आणि 1962 मधील सुवर्णपदक विजेत्या संघाचे कर्णधार)
कोलकात्याचा सुगंध गेला
जाकार्ता येथे १९६२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पीकेंनी 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारतीय फुटबॉल संघाची कमान सांभाळली. त्यांच्याच नेतृत्वाखालील भारतीय संघाने फ्रान्ससारख्या दिग्गज संघाविरुद्ध बरोबरी साधली. हा बरोबरी साधणारा गोल पीकेंचाच होता. केवळ हीच कामगिरी त्यांची ओळख अजिबात नाही. त्याच्याही आधी ते 1956 ची मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धा खेळले. त्या वेळी भारताला स्वातंत्र्य मिळून उणीपुरी नऊ वर्षे झाली होती. त्या वेळी ते भारतीय संघाचे आघाडीचे खेळाडू होते. या ऑलिम्पिकमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 4-1 असा दणदणीत पराभव केला. भारताच्या या विजयातही पीके आपली छाप सोडून गेले. या ऑलिम्पिकमध्ये भारत फुटबॉलमध्ये चौथ्या स्थानी राहिला. फिफाने Federation International de Football Association | FIFA | 2004 मध्ये त्यांना ऑर्डर ऑफ मेरिट Order of Merit | पुरस्काराने गौरविले होते. अर्जुन पुरस्कार मिळविणारे ते भारताचे पहिले फुटबालपटू आहेत. बिहार संघाकडून 1952 मध्ये संतोष ट्रॉफीद्वारे पदार्पण करणाऱ्या याच पीकेंनी नंतर ५१ वर्षांनी मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबचे Mohammedan Sporting Club | प्रशिक्षकपद स्वीकारून नवी इनिंग सुरू केली.
भारतीय फुटबॉल संघातील तीन धुरंधर खेळाडूंची तिकडी ओळखली जायची. या तिकडीत पीकेंसह चुन्नी गोस्वामी, तुलसीदास बलराम यांचा समावेश होता. पीकेंनी 1967 मध्ये फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली. मात्र, प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्दही बहरली. प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीतही त्यांनी 54 ट्रॉफ्या जिंकल्या. पश्चिम बंगालमध्ये मोहन बागान, ईस्ट बंगालसारखे नावाजलेले संघ होते. मात्र, बंगालमध्ये जन्मलेले पीके कारकिर्दीत कधीच या संघांकडून खेळले नाहीत. त्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द पूर्व रेल्वे संघातच घालविली. कोलकात्यात त्यांच्या कारकिर्दीला आर्यन एफसी क्लबपासून सुरुवात झाली. या आर्यन क्लबचे प्रशिक्षक होते दासू मित्रा. पीकेंसारख्या गुणवान खेळाडूला मात्र या संघात कुचंबणाच झाली. कारण प्रशिक्षक मित्रा यांनी त्यांना कधीच चांगली वागणूक दिली नाही. त्यामुळेच त्यांनी हा क्लब सोडला.
‘‘मी कोलकाता सोडून जमशेदपूर जाण्याचा विचार करीत होतो. तेव्हा बाघा शोम यांनी मला भारतीय रेल्वेत नोकरीची संधी दिली.’’
– पी. के. बॅनर्जी
हेच पीके अखेरपर्यंत रेल्वेच्या संघाकडूनच खेळले. ज्या मोहन बागान Mohun Bagan |, ईस्ट बंगालकडून East Bengal | ते कधीच खेळू शकले नाही, त्या क्लबमध्ये त्यांनी निवृत्तीनंतर प्रवेश केला. अर्थात, हा प्रवेश प्रशिक्षक म्हणून झाला. त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत मोहन बागानने आयएफए शील्ड IFA Shield |, रोव्हर्स कप Rovers Cup | आणि डुरंड कप Durand Cup | जिंकला, तर ईस्ट बंगालने त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९९७ मध्ये फेडरेशन कप जिंकला. हा फेडरेशन कप ईस्ट बंगालसाठी अतिशय महत्त्वपूर्ण होता. कारण त्यांच्यासमोर त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी मोहन बागान क्लब होता. त्याला पराभूत करून ईस्ट बंगालने East Bengal | पीकेंच्या मार्गदर्शनाखाली हा करंडक आपल्या नावावर कोरला.
‘‘भारतीय फुटबॉलच्या इतिहासात बॅनर्जी यांचं नाव सुवर्णाक्षरांनी नोंदलं जाईल. त्यांचे कार्य पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.’’
– प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष, अखिल भारतीय फुटबॉल महासंघ All India Football Federation |
भारतीय फुटबॉलचा इतिहासपुरुष
भारतीय फुटबॉलला चेतना देणारे पीके म्हणूनच महान होते. भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया Baichung Bhutia | यांनी पीकेंना भारतीय फुटबॉलचा इतिहासपुरुष म्हंटले आहे. भुतिया त्यांना प्रदीपदा म्हणतात. आपल्या शिष्यांना त्यांनी फुटबॉलचे चांगले संस्कार दिले. याच शिष्यांपैकी एक बायचुंग भुतिया Baichung Bhutia | आहेत. ते केवळ उत्तम खेळाडू, प्रशिक्षकच नव्हते, तर महान व्यक्तीही होते, असे बायचुंगने आपल्या एका लेखात म्हंटले आहे.
‘‘चांगले वर्तन कसे करायचे, याची शिकवण आम्हाला ते मैदानाबाहेर नेहमी द्यायचे. कोलकात्याच्या मैदानावर आघाडीवर खेळताना प्रसारमाध्यमांशी नम्रतेने सामोरे कसे जायचे याचे धडे त्यांनी दिले. प्रशिक्षकापेक्षा ते आमचे पालक होते.’’
भुतिया यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ईस्ट बंगालकडून East Bengal | खेळताना भुतियाने 1997 मध्ये फेडरेशन कपच्या उपांत्य फेरीत हॅटट्रिक केली होती. त्याच्या या हॅटट्रिकच्या जोरावरच ईस्ट बंगालने मोहन बागानचा ४-१ असा दणदणीत पराभव केला. हा सामना पाहण्यासाठी सव्वा लाख प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. मोहन बागानविरुद्धच्या या सामन्यात भुतियाला मोहन बागानचे प्रशिक्षक अमल दत्ता यांच्या वर्णद्वेशी टिप्पणीला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत बॅनर्जी भुतियाच्या पाठीशी खंबीरपणे राहिले. सगळा दबाव त्यांनी स्वतःवर घेतला. भुतियावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली.
ही आठवण सांगताना भुतिया म्हणाले, ‘‘या सामन्यात प्रचंड तणावाची स्थिती होती. अमलदा (अशाही स्थितीत भुतिया त्यांचा उल्लेख आदरानेच करतो) यांनी त्या वेळी काही वादग्रस्त विधानेही केली होती. मात्र, प्रदीपदांनी आपल्या खेळाडूंवर कोणताही दबाव येऊ दिला नाही. प्रदीप दा खूपच शांत होते. सामना पाहताना ते जराही विचलित झालेले दिसले नाहीत. त्यामागे हेच कारण होते, की खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी व्हावी. माझ्या कारकिर्दीतला सर्वोत्तम सामन्यांपैकी हा एक सामना होता.’’ भुतियाला प्रदीपदांच्या आठवणी दाटून आल्या होत्या.
प्रदीपदांमुळेच मी : थापा
भारतीय फुटबॉल संघाचे महान स्ट्रायकर श्याम थापा Shyam Thapa | यांनी सांगितले, की मी आज जो काही आहे, तो पी. के. बॅनर्जी यांच्यामुळेच. जर मला बॅनर्जी यांचे मार्गदर्शन मिळाले नसते तर मी चांगला स्ट्रायकर होऊच शकलो नसतो. थापा यांनी एका मुलाखतीत सांगितले, की “मी 1975 मध्ये जेव्हा ईस्ट बंगालकडून खेळत होतो, तेव्हा मोहन बागानच्या चार डिफेंडरना चकवा देऊन मी गोल केला होता. त्या वेळी माझे प्रशिक्षक प्रदीपदा होते. हो, मी गोल केला. ते अविश्वसनीयच होतं, पण हे प्रदीपदांमुळेच शक्य झालं. ते मान्य करावंच लागेल. त्यासाठी हा सामना तुम्ही पाहू शकता. चार डिफेंडरला चकवून गोल करणं हे सगळंच जादुई होतं.” त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे १९७८ मध्ये थापा मोहन बागान क्लबमध्ये गेले.
कलकत्ता फुटबॉल लीगमध्ये मोहन बागानकडून खेळताना ईस्ट बंगालविरुद्ध थापा यांनी अप्रतिम व्हॅली गोल Valley Goal | केला होता. हादेखील एक प्रकारे जादुई गोल होता, जो आजही फुटबॉलप्रेमी विसरलेले नाहीत. या गोलचेही श्रेय थापा यांनी प्रदीपदांनाच दिले आहे.
या गोलविषयी सांगताना थापा म्हणाले, “तो गोलच असा होता, की आजही मला त्याविषयी विचारले जाते. लोकं मला रस्त्यावर जाताना पाहतात तेव्हा त्या गोलची हमखास आठवण करून देतात. मी याचे श्रेयही प्रदीपदांनाच देतो. केवळ तांत्रिक प्रशिक्षणच नाही, तर त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहनही दिलं होतं. फक्त मलाच नाही, तर संघातील कोणालाही विचारा, तर ते तुम्हाला हेच सांगतील.” प्रदीपदा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलो याचा मला अभिमान आहे. ते माझ्यातील सर्वोत्तम कौशल्य बाहेर काढत होते. मी श्याम थापा आहे, कारण माझ्याकडे प्रदीपदांची शिकवण आहे, असेही थापा अभिमानाने सांगतात.
पेलेंविरुद्ध लढायला शिकवलं : सुब्रता भट्टाचार्य
पेलेंसारख्या महान फुटबॉलपटूविरुद्ध खेळण्याचं धाडस आम्हाला प्रदीपदांनी दिलं, अशी आठवण भारतीय फुटबॉल संघाचे माजी डिफेंडर सुब्रता भट्टाचार्य यांनी सांगितली. बॅनर्जी मोहन बागानचे प्रशिक्षक होते, तर सुब्रता संघाचे कर्णधार. त्या वेळी दिग्गज पेलेंच्या न्यूयॉर्क कॉस्मॉस संघाला 2-2 असे बरोबरीत रोखले होते. या संघात शिबाजी बॅनर्जी, प्रसून बॅनर्जी, गौतम सरकार, बिदेश बोस, श्याम थापा आणि प्रदीप चौधरी यांचा समावेश होता.
खेळाडूंचा मार्गदर्शक हरपला
भारतीय फुटबॉल संघाचे सहाय्यक प्रशिक्षक षण्मुगम वेंकटेश यांनीही पीकेंच्या आठवणींना उजाळा दिला. भारतीय फुटबॉलचे ते पहिले आयकॉन होते, जे खेळाडूंना नेहमी चांगला सल्ला द्यायचे. भारताचे माजी कर्णधार व प्रशिक्षक राहिलेले बॅनर्जी यांनी भारताकडून 36 सामने खेळले आणि 19 गोल केले. वेंकटेश यांनी जेव्हा भारतीय संघात स्थान मिळवले तेव्हा पीके तांत्रिक निदेशक होते. पीके ज्या क्लबशी जोडलेले होते, त्या संघाकडून खेळता आले नाही, याची खंत वेंकटेश यांनी व्यक्त केली. मात्र, त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे मनोबल वाढले, असेही ते म्हणाले.
भारताचे फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्याशी संवाद साधण्याची ज्या ज्या वेळी संधी मिळाली ते माझ्यासाठी सुखद क्षण होते.
– सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू
आज एक उत्तम व्यक्तीला आम्ही गमावले आहे. अशी व्यक्ती ज्याच्यावर मी प्रेम करीत होतो, ज्यांचा आदर करीत होतो. मी जेव्हा 18 वर्षांचा होतो, तेव्हा त्यांच्या खेळातील कारकिर्दीचा माझ्यावर प्रभाव होता.
– सौरभ गांगुली, अध्यक्ष, बीसीसीआय
Thanks DEAR.Nice
🙂
खूप छान लेख लिहिलास महेश….फक्त नदीचे नाव तिच्या असे आहे…विषय अवघड असूनही लेख छान उतरलाय..