कोणाला हवी चार दिवसांची कसोटी?
पाच दिवसीय कसोटीला १४३ वर्षांची समृद्ध परंपरा आहे. क्रिकेटचा आत्मा म्हणून या कसोटीचं आजही क्रिकेटपटूंच्या मनात एक अढळ स्थान आहे. मात्र, आता ही पाच दिवसांची कसोटी चार दिवसांची करण्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने | ICC |आणला आहे. त्यावरून अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला आहे. यात विराट कोहलीपासून ग्लेन मॅकग्रथ, शोएब अख्तर अशा अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही यात उडी घेत ‘आयसीसी’च्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. नेमके काय आहे या नव्या प्रस्तावात, त्यामुळे काय बदल होतील, नव्या प्रस्तावानुसार चार दिवसांची कसोटीमुळे काय नुकसान होणार आहे किंवा काय फायदा होणार आहे, कोणाला हवीय ही चार दिवसांची कसोटी, याचा ३६० अंशांतून घेतलेला वेध…
कसोटी सामन्याची सुरुवात कधी झाली?
कसोटीतले | Test cricket match | बदल समजून घेताना कसोटीच्या इतिहासात डोकावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुळात क्रिकेटची जडणघडणच कसोटी क्रिकेटमधून झाली आहे. कलात्मक फलंदाजी, वैविध्यपूर्ण गोलंदाजीची शैली असो वा अन्य काही क्रिकेट कौशल्य | Cricket Skill | असो, हे सर्व या कसोटीची | Test Cricket | देण आहे. म्हणूनच कसोटीला क्रिकेटचा आत्मा म्हंटले जाते. याची सुरुवात मेलबर्नपासून झाली. पाच दिवसीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला अधिकृत सामना १५ ते १९ मार्च १८७७ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झाला. मेलबर्न मैदानावर | Melbourne Stadium | झालेला हा सामना ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनी जिंकला होता. या कसोटी क्रिकेट सामन्याचे शतकमहोत्सवही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यानेच साजरे करण्यात आले. हा पहिला सामना झाला १२ ते १७ मार्च १९७७ रोजी. गंमत म्हणजे, हा सामनाही ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनीच जिंकला. इतिहासातला पहिला आणि शंभरावा सामना एक प्रकारे ऑस्ट्रेलियानेच साजरा केला. यानंतर ऑक्टोबर २०१२ मध्ये कसोटी सामना प्रकाशझोतात खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी तीन वर्षांनी झाली. म्हणजे २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१५ रोजी प्रकाशझोतातील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यान अॅडीलेडमधील ओव्हल मैदानावर झाला. ऑस्ट्रेलिया नशीबवानच म्हणायला हवा, ज्यांनी कसोटी पर्वाचा, प्रकाशझोतातील सामन्याचा श्रीगणेशा केला.
काय आहे कसोटी बदलाचा नवा प्रस्ताव?
आयसीसीचे | ICC | क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक प्रचंड व्यस्त आहे. यात पाच दिवसांच्या कसोटी | 5-day Test Cricket | स्पर्धांचा कार्यक्रम अतिशय वेळखाऊ आहे. जर कसोटी चार दिवसांची केली तर वेळ वाचेल, त्याचबरोबर अधिकाधिक स्पर्धाही आयोजित करता येतील, असा आयसीसीचा विचार आहे. त्यामुळेच कसोटी पाचऐवजी चार दिवसांची करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. २०२३ च्या मोसमापासून हा बदल अनिवार्य करण्याचा आयसीसीचा | ICC | विचार आहे. मात्र, हा बदल २०२३ ते २०३१ या कालावधीसाठीच करण्यात येणार आहे. हा बदल यशस्वी झाला तर कसोटी चार दिवसांचीच राहणार आहे. | espncricinfo |ने एका वृत्तात या नव्या बदलामागचे कारण दिले आहे. क्रिकेटच्या स्पर्धा जास्तीत जास्त व्हाव्यात, तसेच ‘बीसीसीआय’च्या मागणीनुसार, दोन देशांमधील मालिकांची संख्या वाढावी आणि आयपीएलसारख्या टी-२० लीग सर्वच ठिकाणी व्हाव्यात, यासाठी आयसीसी कसोटीत बदल करीत आहे. आयसीसीचा हा प्रस्ताव व्यावसायिकतेतूनच पुढे आला आहे. अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी तो सादर करण्यात आला आहे.
कोणाला हवाय चार दिवसांचा कसोटी सामना?
यापूर्वी झालेल्या चार दिवसांच्या कसोटी सामन्याच्या प्रयोगानंतर हा नवा प्रस्ताव क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख केव्हिन रॉबर्ट्स यांनाही पटला. ‘ईएसपीएन’शी | ESPN | बोलताना ते म्हणाले, की या नव्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. पारंपरिक विचार न करता आता व्यावहारिक विचार व्हायला हवा. यापूर्वीचे कसोटी सामने पाहिले तर किती षटके खेळली गेली, किती वेळ लागला हे एकदा तपासून पाहिले तर लक्षात येईल की चार दिवसांची कसोटी योग्य आहे. रॉबर्ट यांना जरी हा नवा प्रस्ताव पटला असला, तरी ऑस्ट्रेलियासह जगातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याला कडाडून विरोध केला आहे.
चार दिवसांची कसोटीचा प्रयोग यापूर्वी कुठे झाला?
पाचऐवजी चार दिवसांची कसोटी झाल्यास स्पर्धांचा कार्यक्रम वाढेल अशी अपेक्षा आयसीसीने व्यक्त केली आहे. मुळात चार दिवसांचा कसोटी सामना नवा नाही. २०१९ मध्ये इंग्लंड व आयर्लंड यांच्यात चार दिवसांची कसोटी सामना झाला आहे. तत्पूर्वी, २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे दरम्यान चारदिवसीय कसोटी सामना झाला होता.
चार दिवसांची कसोटी का नको?
फिरकी गोलंदाजांना संधी मिळणार नाही. कारण पाचव्या दिवशी खेळपट्टी फिरकीला पोषक झालेली असते. |
सामने निकाली निघणार नाहीत. जास्तीत जास्त सामने अनिर्णीतच | Draw | राहण्याची शक्यता अधिक |
पाचवा दिवस चुरशीचा मानला जातो. चार दिवसीय क्रिकेटने ही चुरस राहणार नाही |
अनेक कसोटी सामन्यांचे निकाल पाचव्या दिवशीच लागलेले आहेत. |
कसोटीतच शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही गोष्टींची कस लागतो. तेच या पाच दिवसांच्या कसोटीचे वैशिष्ट्य आहे. |
विराट कोहलीच्या मते, बदल काय हवा?
कसोटी आकर्षक करायची असेल तर खेळपट्ट्या उत्तम केल्या पाहिजे. कारण खेळपट्टी चांगली असेल तर सामना रटाळ होणार नाही. खेळपट्टी अशी असावी, जी फलंदाज आणि गोलंदाजांना साह्यभूत ठरेल. त्यामुळे फलंदाजांना हे जाणवेल की चूक केली नाही, तर आउट होणार नाही आणि गोलंदाजांनाही वाटेल, की फलंदाजाला चूक करण्यास भाग पाडू.
का नको चारदिवसीय कसोटी सामना?
सचिन तेंडुलकर | Sachin Tendulkar | भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेही याला विरोध करण्याचे कारण स्पष्ट केले आहे. फिरकी गोलंदाजांच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीवरच घाला घालणारा हा निर्णय असल्याचे सचिनने म्हंटले आहे. कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी फिरकी गोलंदाजांची कमाल पाहायला मिळते. ते परिस्थितीचा फायदा उचलून आपल्या संघासाठी योगदान देतात. जर आयसीसीने कसोटी चार दिवसांची केली तर या फिरकी गोलंदाजांची ही संधी हिरावली जाईल. फिरकी गोलंदाज जुन्या चेंडूचा आणि अनेक षटके खेळून झालेल्या खेळपट्टीचा अधिक लाभ उठवतात आणि हाच तर खेळाचा एक भाग आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने या बदलाचे समर्थन अजिबात केलेले नाही. कसोटीच्या मूळ ढाचात कोणताही बदल करणे इष्ट नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा विस्तार म्हणून कसोटीकडे पाहिले जाते. जर चार दिवसांची कसोटी केली तर दुसऱ्याच दिवशी फलंदाज विचार करेल, की आता फक्त दीड दिवस शिल्लक आहे. म्हणजे काय, तर विचार बदलेल. जर कसोटी सामना एक दिवसाने कमी होणार असेल तर फिरकी गोलंदाज त्याचा फायदा कसा काय उचलू शकतील? सुरुवातीचे दोन दिवस तर फिरकी गोलंदाजांचे चेंडू वळण आणि उसळी घेत नाहीत. वेगवान गोलंदाज पाचव्या दिवशी गोलंदाजी करीत नाहीत. |
रिकी पाँटिंग | Ricky Ponting | पाचदिवसीय कसोटी सामना जर चारदिवसीय केला तर तो अनिर्णीत राहण्याची जास्त शक्यता आहे. या बदलामुळे जास्तीत जास्त सामने अनिर्णीत होतील, अशी शक्यता अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली आहे. रिकी पॉंटिंगच्या मते, गेल्या दोन वर्षांत अनेक सामने चार दिवसांत संपले आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षांवर नजर टाकली तर किती कसोटी सामने ड्रॉ झाले आहेत? जर सगळेच सामने चारदिवसीय असते तर त्यातील बहुतांश सामने अनिर्णीतच झाले असते. | विराट कोहली | Virat Kohli | विराट कोहलीनेही चार दिवसांच्या कसोटी सामन्याला विरोध केला आहे. तो म्हणाला, की डे-नाइट कसोटी क्रिकेटला जसे पुढे आणण्याचा प्रयत्न होत आहे, तो स्तुत्य आहे. त्यातून उत्साह संचारतो. मात्र, कसोटीचं रूपच बदलण्याचा प्रयत्न होत असेल तर तो सर्वथैव चुकीचा आहे. त्यापेक्षा डे-नाइट कसोटीवरच अधिक लक्ष केंद्रित करायला हवं. त्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे कसोटी सामने अधिक आकर्षक होतील. |
ग्लेन मॅकग्रथ | Glenn Mcgrath | ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रथनेही चार दिवसांच्या कसोटीला विरोध दर्शवताना स्वत:ला पारंपरिक म्हणवून घेण्यात धन्यता मानली आहे. तो म्हणाला, की तुम्ही मला परंपरावादी, पुराणमतवादी काहीही म्हणा, पण कसोटी सामना जसा आहे तसाच तो छान आहे. माझ्यासाठी तर पाच दिवसांचा कसोटी सामना खूप विशेष आहे. तो आणखी छोटा करण्याचा मी तिरस्कार करतो. | नॅथन लियोन | Nathan Lyon | ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लियोनने सांगितले, की चार दिवसांचे कसोटी सामने अधिकाधिक अनिर्णीत राहतील. कसोटीचा पाचवा दिवस चुरशीचा असतो. एक तर हवामानाचं एक कारण आहे. सध्या जर तुम्ही पाहिलं, तर खेळपट्ट्या फ्लॅट राहतात. फलंदाजांना जास्त संधी मिळते. त्यासाठी तुम्हाला काही वेळ हवा असतो, ज्यामुळे खेळपट्टी तुटेल आणि फिरकी गोलंदाजांना संधी मिळेल. त्यासाठी पाचवा दिवस हवा असतो. या पाचव्या दिवसासाठीच चार दिवसांचा कसोटी सामना नको. |
शोएब अख्तर | Shoaib Akhtar | पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने तर आयसीसीच्या या बदलाच्या विचारांना मूर्खपणा म्हंटले आहे. त्याने आयसीसीच्या या कल्पनेलाच आशिया खंडातील देशांच्या प्राबल्याविरुद्ध कटकारस्थान असल्याचे म्हंटले आहे. कसोटी सामन्यात सर्वाधिक प्रभाव आशियातील फिरकी गोलंदाजांचाच राहिला आहे. पाचव्या दिवशी सामन्यात काय होते, हे सर्वांनाच माहीत आहे. सचिनच्या मताशी समर्थन देताना तो म्हणाला, की फिरकी गोलंदाजांचा हक्क हिरावून घेण्यात काहीही अर्थ नाही. एका यूट्यूब चॅनलवर बोलताना शोएब म्हणाला, की कसोटी क्रिकेटला छोटे करण्यात काहीही अर्थ नाही. कारण तुम्ही आधीच टी-२० ची कल्पना आणली आहे. आता कसोटीत छेडछाड करण्याची गरज नाही. बीसीसीआयचे महत्त्व मान्य करताना शोएब म्हणाला, की बीसीसीआयच्या मर्जीशिवाय आयसीसी असे पाऊल उचलूच शकत नाही आणि आता बीसीसीआयची कमान सौरभ गांगुलीच्या हातात आहे. कारण तो प्रशासक बनण्यापूर्वी कर्णधार आणि खेळाडू राहिलेला आहे. त्यामुळे बीसीसीआय या बदलाला विरोध करेल. |
संदीप पाटील | Sandeep Patil | माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनीही कसोटीच्या नव्या रचनेला विरोध करताना म्हंटले आहे, की हा बदल म्हणजे एका व्यक्तीच्या आत्म्याची परीक्षा घेणे आहे. १९८३ च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघात असलेले संदीप पाटील म्हणाले, की मी जुन्या विचारांचा आहे. पाच दिवसीय कसोटी सामन्यातला पहिला दिवस मध्यमगती गोलंदाजांचा असतो आणि ही परीक्षा पाचव्या दिवसापर्यंत असते. जेव्हा खेळपट्टी तुटते आणि चेंडू वळतो, तेव्हा फिरकी गोलंदाजांचा सामना करावा लागतो. एकूणच कसोटी क्रिकेट तुमच्या आत्म्याची परीक्षा घेत असतो. तुम्ही त्याचा आत्मा आणि त्याची परीक्षाच हिरावून घेत आहात. |
टिम पेन | Tim Paine | ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने या कसोटीच्या नव्या प्रस्तावाला विरोध केला आहे. चार दिवसांचा कसोटी सामना झाला तर आपल्याला निकाल मिळणार नाहीत. त्याच्या पुष्ट्यर्थ त्याने ‘अॅशेस’चे उदाहरण दिले. या स्पर्धेत प्रत्येक कसोटीचा निकाल पाचव्या दिवशीच लागलेला आहे. कसोटी क्रिकेटपटू होण्याआधी चार दिवसांचे प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळलेलोच असतो. कसोटीतच शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही गोष्टींची कस लागतो. स्थानिक दर्जाचे प्रथम श्रेणी क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये हाच तर फरक आहे. तेव्हा कसोटी क्रिकेट आहे तसेच सुरू राहावे. |
Follow us