धावपटू द्युती चंद हिची एक धाव स्त्री अस्तित्वासाठी!

स्त्रीत्व नाकारणाऱ्या एका अशास्त्रीय चाचणीविरुद्ध ती लढली. ती स्वतःच्या अस्तित्वासाठीच लढली नाही, तर जगातील सर्वच महिला अॅथलिट्ससाठी तिची लढाई सुवर्णाक्षराने नोंदली जाईल. रिओ ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर शर्यतीत तब्बल ३६ वर्षांनी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओडिशाच्या द्युती चंदची ही संघर्षगाथा, जिची एक धाव स्त्री अस्तित्वासाठी निर्णायक ठरली.
ग्लासगोतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी २०१४ मध्ये तिची निवड झाली. केवढी मोठी गोष्ट होती तिच्यासाठी! पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. बेंगळुरूच्या स्पोर्टस् अॅथॉरिटी ऑफ इंडिया (साई) संकुलात डॉक्टरांनी तिची अचानक चाचणी घेतली आणि एक धक्कादायक निर्णय समोर आला. तिला भारतीय संघातून वगळण्यात आले.
सर्वसाधारणपणे एखाद्या खेळाडूला वगळण्यामागे एक कारण स्पष्ट असते, ते म्हणजे डोपिंगमध्ये सापडणे. पण तिला वगळण्याचे हे कारण अजिबात नव्हतं. एका १८ वर्षांखालील अॅथलिटच्या मनावर आघात करणारे ते कारण तिला सांगितलेही नव्हते. दुसऱ्या दिवशी तिला एका वृत्तपत्रातून कळले, की टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण पुरुषपातळीएवढे असल्याने तिला महिला संघातून वगळण्यात आले. स्पर्धेतला संघर्ष जितका कठीण असतो, त्यापेक्षाही एका स्त्रीच्या वाट्याला येणारा मैदानाबाहेरचा संघर्ष किती तरी मोठा असतो, याचे हे ज्वलंत उदाहरण होते. ओडिशाची धावपटू द्युती चंदच्या मनावर प्रचंड आघात करणारा हा निर्णय होता. ती बातमी तिच्या मनाचा थरकाप उडवणारी होती!
इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकपासून महिला अॅथलिटसाठी ‘हायपर अॅण्ड्रोजेनिझम’ ही चाचणी लागू केली होती. या चाचणीची द्युती चंद बळी ठरली. ही तर अलीकडची चाचणी आहे, ज्याचा फटका द्युतीला बसला होता. यापूर्वीच्या चाचण्यांनी तर अनेक महिलांची कारकीर्दच संपुष्टात आणली आहे. भारताची शांती सुंदरराजन, पिंकी प्रामाणिक यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली ती याच चाचण्यांनी. दक्षिण आफ्रिकेच्या कॅस्टर सेमेन्यावरही अशाच चाचणीमुळे २००८मध्ये बंदी आणली होती. हे प्रकरण प्रचंड गाजले होते. त्यावेळी तिच्या पाठीशी संपूर्ण दक्षिण आफ्रिका उभा राहिला. अखेर ‘आयओसी’लाही नमते घ्यावे लागले. दुर्दैवाने द्युती चंदच्या वाट्याला असले काही आले नाही. आपल्याकडे विराट-अनुष्काचे ब्रेकअप झाले तर केवढी चर्चा होते! मात्र, द्युतीच्या बाबतीत घडलेल्या संवेदनशील प्रश्नावर कोणाला बोलावेसेही वाटले नाही!
द्युती अत्यंत सामान्य घरातली मुलगी. तिचे स्त्रीत्व नाकारले गेले तेव्हा ती कोणत्या चाचणीवर आधारित आहे याची तिला काहीही कल्पना नव्हती; पण तिला हे ठाऊक होते, की ती मुलगीच आहे. तिच्यामागे तिचे कुटुंब उभे राहिले. मुळात स्त्रीत्व नाकारणारी ही चाचणीच सदोष आहे, ज्यामुळे एखाद्या महिलेला ती पुरुष आहे की स्त्री हे सिद्ध करता येत नाही. एखाद्या महिलेतील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जर उत्तेजक द्रव सेवनाने वाढले असेल तर ती किंवा तो खेळाडू बंदीस पात्र राहील. मात्र, नैसर्गिकपणे एखाद्या महिलेत टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण पुरुषपातळीएवढे असेल तर ती दोषी कशी ठरू शकेल? या नैसर्गिक वाढीमागे तिचा काय दोष? द्युतीच्या गुणसूत्रांत तर कोणताही दोष नव्हता. इथे पुरुषांना मात्र पूर्णपणे सवलत असते. कारण त्यांचे टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण नैसर्गिकरीत्या कितीही वाढले तरी ते ग्राह्यच धरले जाते; पण महिलेच्या बाबतीत ते गंभीरपणे विचारत घेतले जाते. तिच्याकडे संशयाने पाहिले जाते.
द्युतीच्या मदतीला कोलकात्याच्या ‘जेंडर व्हेरिफिकेशन टेस्ट’च्या अभ्यासक पायोश्नी मित्रा धावून आल्या. पतियाळातील ‘साई’चे संचालक जिजी थॉमसनही तिच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे द्युतीने हायपर अँड्रोनिझम धोरणालाच ‘कॅस’मध्ये आव्हान दिले. ‘कॅस’ म्हणजे कोर्ट आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टस्. अर्थात, त्याला खेळांचे सुप्रीम कोर्टच म्हटले जाते. ‘कॅस’मध्ये जाण्याचे धाडस आजपर्यंत कोणत्याही खेळाडूने केले नव्हते. ‘कॅस’ने हे मान्य केले, की महिला खेळाडूंत टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण पुरुषपातळीएवढे असले तरी, त्यामुळे त्या महिला खेळाडूला फायदा होऊ शकतो हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे ‘कॅस’ने ‘हायपर अँड्रोनिझम’ची चाचणीच दोन वर्षांपर्यंत स्थगित केली. टेस्टोस्टेरॉनमुळे फायदा होत असेल तर ते आता आयओसी आणि आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाला दोन वर्षांत सिद्ध करावे लागेल, तोपर्यंत अशी चाचणी केली जाऊ नये असा निकालच ‘कॅस’ने दिला. स्त्री अस्तित्वासाठी तिची ही एक धाव कित्येक महिलांना प्रेरणा देऊन गेली. द्युती रिओ ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर शर्यतीत तब्बल ३६ वर्षांनी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. यापूर्वी १९८०मध्ये पी. टी. उषा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती.
द्युती चंदमुळे जगातील सर्वच महिला अॅथलिटना या निर्णयाचा फायदा मिळाला. थोडक्यात म्हणजे द्युतीने जगातील सर्वच महिला अॅथलिटना स्त्रीत्व बहाल केले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे हे द्युतीसाठी अभिमानास्पद आहेच, त्याहीपेक्षा तिने जगातील महिला अॅथलिटना दिलेला स्त्रीत्वाचा सन्मान एखाद्या गोल्ड मेडलपेक्षाही अनमोल आहे! आता कोणत्याही महिला अॅथलिटने गोल्ड मेडल जिंकले, की त्या मेडलला द्युतीच्या संघर्षाची चमक असणार आहे. द्युतीचा संघर्ष काहीसा एरिन ब्रोकोविचसारखा वाटतो. फरक एवढाच होता, द्युती स्त्रीत्व नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध लढली, तर एक सामान्य क्लार्क असलेली एरिन ब्रोकोविच पीडितांसाठी लढत होती. दोघींमध्ये एक साम्य होते, ते म्हणजे दोघींनाही कायद्याचे शून्य ज्ञान होते. मात्र, तरीही त्या न्यायासाठी कायद्याची लढाई जिंकल्या, त्या विजीगिषू वृत्तीमुळेच.
बंदीमुळे मी जवळजवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणेच सोडले होते. मात्र, आता रिओ ऑलिम्पिकमध्ये पात्रता सिद्ध केली आहे. आनंदित आहे. हे माझ्यासाठी अतिशय कठीण वर्ष होतं. प्रशिक्षक एन. रमेश आणि माझी मेहनत शेवटी फळास आली.
– द्युती चंद
(Maharashtra Times, Nashik & Nagpur, 13 Aug 2016)
[jnews_block_8 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]