उत्सवमूर्ती दीपक खानकरी…
एक चित्र चुकलं नसतं. ते म्हणजे आजची उत्सवमूर्ती दीपक खानकरी याचं. म्हणजे हा जसा शाळेत दिसायचा तसाच तो आजही दिसतो. चेहऱ्यातही फारसे बदल नाही. त्याची उभं राहण्याची तीच ती साधी निरागस पद्धत, तेच ते निरागस हास्य, तीच ती भोळाभाबडी देहरचना.
kheliyad.sports@gmail.com | M. +91 80875 64549
शाळेत असताना चित्रकलेचा तास लई आवडायचा. तसं पाहिलं तर सगळ्याच विषयांच्या वह्यांची शेवटची पाने आमच्या कलाकारीची साक्ष देत असायच्या. स्वतःच्याच नावाची कॅलिग्राफी तर प्रत्येकाच्या आवडीचा विषय. आमची प्रतिभा एवढी अचाट असायची, की वहीच्या मुखपृष्ठावरील देखण्या हिरोईनलाही दाढी-मिशा फुटलेल्या पाहायला मिळायच्या. तिचं विद्रुपीकरण झालंय असं आमच्या प्रतिभेला अजिबात मान्य नसायचं. एखादा तरणाबांड हिरो असेल तर त्याची छानशी हेअरस्टाइल अशी काही पिंजारलेल्या केशरचनेने चितारायचो की विचारू नका… (एवढं करूनही आम्ही आमच्या याच वह्या मोठ्या दिमाखात तपासायला द्यायचो) देखण्या हिरोला प्रौढत्व प्राप्त करून देण्याची किमयाही आमच्या बॉलपेनने साकारल्याचं आजही आठवतं. आज विलाससारख्या एखाद्या निष्णात चित्रकाराला सांगितलं, तर तो नाकीडोळीपासून त्याचं प्रौढत्व दाखवेल. पण आमचं ते वय इतकं निष्णात नव्हतंच. प्रौढत्वाच्या खुणा आम्ही फक्त काळ्या केसांमधील पांढऱ्या रेघोट्यांनी दाखवायचो. बाकी सगळं सेम. त्याचा सदरा तोच, त्याच्या डोळ्यातली लकाकी तीच. पण केसांमध्ये फुटलेले पांढरे ढग तेवढे नवे. असो.
त्या वेळी आमच्या वहीवर जर आमच्याच शाळकरी मित्रांचे चित्र असते तर… आज ही कल्पना केली तर अनेक चित्र चुकले असते. समजा आम्ही योगेशचं चित्र हाती घेतलं असतं तर केसांव्यतिरिक्त तो नाना प्रकारे फुलला आहे.. म्हणजे चुकलंच चित्र. शून्य मार्क. जर कीर्तीचं चित्र घेतलं असतं तर तेही चुकलंच असतं. पण एक चित्र चुकलं नसतं. ते म्हणजे आजची उत्सवमूर्ती दीपक खानकरी याचं. म्हणजे हा जसा शाळेत दिसायचा तसाच तो आजही दिसतो. चेहऱ्यातही फारसे बदल नाही. त्याची उभं राहण्याची तीच ती साधी निरागस पद्धत, तेच ते निरागस हास्य, तीच ती भोळाभाबडी देहरचना. बोलण्यातही तीच आदबशीरता (आता या आदबशीरचं चित्र कसं काढलं हे विचारू नका.. उगाच भुवया उंचावण्याचं काम न्हाय. आपण चित्र काढून झाल्यावर वर्णनपण लय झाक करतो) केसांतला रंग वगळता काही काही बदल नाही. खरंच त्या वेळी दीपकची चाळिशी चितारायची झाली असती तर मी हमखास डोक्याची केसंच रंगवले असते…आपले पैकीच्या पैकी कुठे गेले नसते. जाऊद्या… आम्ही शाळकरी मित्र वहीच्या पानापानांत नसू कदाचित, पण मनामनांत तर आहोत…
दीपक खानकरी म्हणजे प्रचंड संघर्ष पाहिलेला, पण चेहऱ्यावर त्या संघर्षाची कोणतीही रडकथा मी कधी पाहिली नाही. तो शाळेत असल्यापासून घराला हातभार लावायचा. म्हणजे भाकरीचा चंद्र शोधणारा तो एक कष्टाळू, तेवढाच श्यामळूही. तो आमच्या अ तुकडीचा मॉनिटरही झाला. कसा झाला ते माहीत नाही, पण झाला. आम्हाला आनंद झाला अगदी मनापासून. (कष्टाळू पोरगं मॉनिटर झालं म्हणून नाही, तर सहज गुंडाळून घेऊ म्हणून) पण हा आनंद क्षणभंगूर ठरला. हा मूलतःच हिशेबी आणि व्यवहारी. (गणितही चीनच्या भिंतीसारखं भक्कम).
नुसते ओठ हलले तरी वहीत नाव टिपायचा. अरे यार, याला काय प्रॉब्लेम आहे कोण जाणे. याने माझ्यासह अनेकांची नावं तर घरून येतानाच लिहून आणायचं तेवढं बाकी ठेवलं होतं. दीपक, पाणी प्यायला जाऊ का… तर याचं उत्तर… नाही. तरीही काही बिलंदर याला न विचारता जायची. अशांची नावं तर याच्या वहीत सुवर्णाक्षरांत नोंदली जायची. पण सोपवलेलं काम दीपक मात्र इमानेइतबारे पार पाडायचा. तरी बरं, याने आमच्या नावांनी वह्या भरल्या, पण प्रत्येक पानाचा हिशेब कधी मागितला नाही. (तो आता अकौंटचा विषय शिकवतो. काय कोण जाणे मागचे हिशेब करून ठेवले असतील… अशी उगाच वाटलेली भीती). पण तो तसा नाही. एकदम साधा, श्यामळू.. कोणी म्हणणार नाही.. हा कारने भेटायला आला असेल…
एरव्ही दर महिन्याला कोणा तरी शाळकरी मित्रांचे वाढदिवस मोबाइलच्या पटलावर दिसायचे. त्यात मी कधीही नसायचो. आज पिंपळगावला होतो. नेमका आजच दीपक खानकरी याचा वाढदिवसही होता. अर्थात, वाढदिवस आणि माझं पिंपळगावला येणं हा निव्वळ योगायोग होता. योगेश घोडकेनेच सांगितलं, अरे आज दीपक खानकरी याचा वाढदिवस. पण लगेच हिरमुसल्या चेहऱ्याने म्हणाला, आता वाढदिवस सेलिब्रेशन बंद केलंय. मीही योगेशसारखाच हिरमुसल्या चेहऱ्याने म्हणालो, का रे…
अरे, फोन केला तरी कोणी येत नाही.
फोन तर करून पाहा…
कीर्तीला फोन लावला तर तो घाईत असतानाही आला. गिफ्टही त्यानेच आणलं. योगेशने उत्सवमूर्ती दीपकला फोन केला.. मला वाटलं, दीपक खानकरी येणारच नाही. पण कोणतेही आढेवेढे न घेता तो झटकन तयार झाला. माझा आनंद द्विगुणित झाला. संदीप बऱ्हाटे तर सोबतच होता.
मी, कीर्ती, संदीप, योगेश आणि उत्सवमूर्ती दीपक… असं मेतकूट जमलं. सीताफळ फ्लेवर (सॉरी कस्टर्ड अॅपल म्हणतात सीताफळाला… स्पेलिंगही येतं बरं. ए. के. वाघ सरांची काश्मिरी मुळी खाऊनही कधी इंग्रजी आलं नाही. पण सरांनी असं अॅपल खाऊ घातलं असतं तर आम्ही यापेक्षा अवघड स्पेलिंग यु… चुटकीसरशी फाडफाड सांगितले असते. पण छे… पाचवीत आमच्या नशिबी काश्मिरी मुळीचाच फ्लेवर होता.. काय करणार…) ज्यूस घेतला.
दीपकला म्हणालोही… अरे तू आमची नावं लिहायचा रे.. दीपकही उगाचच खुलासा द्यायचा. खरंच लईच भोळा…! दीपक असाच राहा बाबा…
दीपक, तू मालगुडी डेज पाहिलं असेल का रे….?
अरे यार, आम्हीच शेजारीपाजारी ही मालिका पाहायचो… पण जाऊदे… ही मालिका अशीच आपल्यासारख्या मित्रांवर बेतलेली.. पण ती काल्पनिक होती हे मला खूप उशिरा समजलं. त्यातली चित्रं आर. के. नारायण यांची होती. आपण रंगवलेली चित्रंही मालगुडी डेजसारखीच अजरामर ठरली.. जाऊदे रे… आपलं वास्तववादी जगणं… म्हणजे पिंपळगाव गुडगुडी डेजसारखं…
Follow on Twitter @kheliyad
[jnews_block_37 first_title=”Follow Facebook Page kheliyad” url=”https://www.facebook.com/kheliyad” header_text_color=”#1e73be” header_line_color=”#1e73be” include_category=”111″]