ई स्पोर्टस खेळाची दस्तक!

यापुढील काळ मैदानी खेळांचा राहील का, याची शंका येते. कारण आताच ई स्पोर्टसने (व्हिडीओ गेम्स) एशियाड स्पर्धेत दस्तक दिली आहे. कालांतराने ई स्पोर्टस ऑलिम्पिकमध्येही समाविष्ट झाला तर आश्चर्य वाटू नये.
kheliyad.sports@gmail.com | Mob. +91 80875 64549
त्याच्या अंगाला जकार्ताची माती लागली नाही. तो धावपटू नाही, कुस्ती खेळत नाही, तुम्ही- आम्ही ऐकलेल्या कोणत्याही खेळाचं कौशल्य त्याच्याकडे नाही. तरीही तो एशियाड स्पर्धेतील ब्राँझ मेडल विजेता आहे! गुजरातमधील तीर्थ मेहताची ही अजब कहाणी आहे. त्याने भारताला ब्राँझ मेडल मिळवून दिलं आहे व्हिडीओ गेममध्ये! धक्का बसला ना? पण हो आशियाई क्रीडा स्पर्धेत आता ई स्पोर्टस हा व्हिडीओ गेमवर आधारित खेळ समाविष्ट झाला आहे. यंदा तो प्रायोगिक तत्त्वावर खेळला गेला. त्यामुळे यातील मेडलिस्ट पदकतक्त्यात झळकले नाहीत. मात्र, 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हा ई स्पोर्टस अधिकृत खेळ असेल. जगातील सव्वा कोटी नागरिकांवर या खेळाने गारूड केलं आहे.
हे सगळं धक्कादायक वाटत असेल. पण यापुढील काळ मैदानी खेळांचा राहील का, याची शंका येते. कारण आताच या खेळाने एशियाडमध्ये दस्तक दिली आहे. कालांतराने तो ऑलिम्पिकमध्येही समाविष्ट झाला तर आश्चर्य वाटू नये. एशियाडमध्ये येण्यापूर्वीच या खेळाच्या दरवर्षी जागतिक स्तरावर स्पर्धा होतात. आणखी धक्कादायक म्हणजे, या खेळांचे प्रेक्षक फिफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेपेक्षा अधिक आहेत. 2015 मध्ये लीग ऑफ वर्ल्ड चॅम्पियनशिप ही ई स्पोर्टसची सर्वांत मोठी स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेच्या अंतिम फेरीला तब्बल साडेतीन कोटीपेक्षा अधिक प्रेक्षक होते. यंदाच झालेली एमएसआय ही ई स्पोर्ट्स स्पर्धेची ग्रँड फिनाले सव्वाशे कोटीपेक्षा अधिक लोकांनी पाहिली. ही फिफा वर्ल्डकपच्या फायनलपेक्षा 20 लाखांनी अधिक आहे!
प्रेक्षकांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर पाच वर्षांतच ई स्पोर्ट्सचे प्रेक्षक अनेक पटींनी वाढले आहेत. हे चिंतनीय आहे! इंग्लंडमध्ये याच ई स्पोर्टससाठी 3 अब्ज पाऊंड खर्च होतात. त्यामुळे या खेळाकडे अनेक प्रायोजक आकर्षित झाले आहेत. ही फुटबॉलसारख्या लोकप्रिय खेळांसाठी धोक्याची घंटा आहे.
ई स्पोर्टस आहे तरी काय?
ई स्पोर्टस म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स स्पोर्ट्स. इंडोनेशियातील जकार्तामध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हा खेळ समाविष्ट झाला. प्रायोगिक तत्त्वावर समाविष्ट झाला असला तरी तो 2022 पासून अधिकृत खेळ म्हणून खेळला जाणार आहे. या स्पर्धेत सहा व्हिडीओ गेम समाविष्ट होते. ते व्हिडीओ गेम असे- एरिना व्हॅलोर, क्लॅश रॉयल, हार्थस्टोन, लीग ऑफ लिजेंड्स, प्रो इव्होलुशन सॉकर, स्टार क्राफ्ट 2. सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन प्रकारांत हे खेळ खेळले जातात. तीर्थ मेहताने भारताला जे ब्राँझ मेडल मिळवून दिले, ते यातील हार्थस्टोन (Hearthstone) या व्हिडीओ गेममध्ये. एशियाडमध्ये सहा व्हिडीओ गेमचा समाविष्ट केला असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर ३० पेक्षा अधिक व्हिडीओ गेम्स आहेत, की ज्यांच्या स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर होतात. यात 25 लाखांपेक्षा अधिक रकमेची पारितोषिके आहेत.
जे खेळ तुम्ही मैदानावर अनुभवले तेच खेळ आता ई स्पोर्टसच्या माध्यमातून कम्प्युटरवर खेळले जातात. कालांतराने आता जे खेळ खेळले जातात ते व्हिडीओ गेमद्वारेच खेळले जाईल. हे भीतिदायक आहे, पण वस्तुस्थिती आहे. पाण्यासारखा पैसा या खेळात आहे. ई स्पोर्टस विजेत्याला कोट्यवधी रुपयांचे घसघशीत पारितोषिक मिळते. जेथे पैसा आहे ते खेळ लोकप्रियतेच्या शिखरावर गेले. आपल्याकडे क्रिकेट हे उत्तम उदाहरण आहे. या खेळाचा प्रवास साधारणपणे 30 वर्षांपूर्वीच सुरू झाला होता. त्या वेळी कम्प्युटर गेम केवळ टाइमपास म्हणून खेळले जात होते. अर्थात, मोजकेच गेम लोकांच्या पचनी पडले होते.
2000 मध्ये या खेळात क्रांतीच झाली. कारण कम्प्युटर स्वस्त झाले, तर इंटरनेट वेगवान. त्यामुळे ऑनलाइन गेमिंगचा पर्याय खुला झाला. हळूहळू कम्प्युटर गेममध्ये कौशल्य आत्मसात झाले आणि त्यातून आंतरराष्ट्रीय स्पर्धेची संकल्पना पुढे आली. आज या ई स्पोर्टसच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा व्यावसायिक स्तरावर होतात. हा खेळ खेळणाऱ्यांची आणि पाहणाऱ्यांची संख्या कोट्यवधीच्या घरात आहे. 2017 मध्ये या व्हिडीओ गेममधून 69 कोटी डॉलरची ( भारतीय रुपयांत 5 हजार कोटी) कमाई केली आहे.
ई स्पोर्टसचा फायदा काय?
ब्रिटिश ई स्पोर्टस असोसिएशनच्या मते, या खेळामुळे वैश्विक मैत्रीसंबंध प्रस्थापित होतात. या असोसिएशनच्या सर्वेक्षणानुसार 54 टक्के लोकांना तसे वाटते. या गेममध्ये जे लँग्वेज टूल्स आहेत, त्यातून विविध भाषांचे प्राथमिक ज्ञान मिळते. गणिती भाषा आणि सामाजिक कौशल्य आत्मसात करता येतात. यामुळे निर्णयक्षमता वाढते. 71 टक्के पालकांना असे वाटते, की या खेळातून मुलांमध्ये सकारात्मक जीवन जगण्याचे कौशल्य वाढते. संघटनात्मक कौशल्य वाढते. तणावरहित जीवन जगता येते.
काय आहे धोका?
अजूनही ई स्पोर्ट्सला खेळाचा दर्जा देण्यास अनेकांचा तीव्र विरोध आहे. ज्या खेळात शारीरिक हालचालच नाही त्यांना खेळ का म्हणावं, असा प्रश्न उपस्थित होतो. हे खरे असले तरी ई स्पोर्टस एशियाडमध्ये समाविष्ट झालाच ना? मात्र, या खेळाने स्थूलत्वाचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करणार आहे. ई स्पोर्टस असोसिएशनच्या मते, कितीही फायदे सांगितले जात असले तरी ते किती योग्य आहेत यातच दुमत आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, व्हिडीओ गेम्समुळे मुले चिडचिड होतात. काही वेळासाठी तणाव घालवण्याचा विचार केला तरी मुले व्हिडीओ गेम्सशिवाय अस्वस्थ होतात. त्यामुळे तणावात भरच पडते. भावनाशून्य होण्याचा सर्वांत मोठा धोका या ई स्पोर्टसमुळे होऊ शकतो. भावनिक नातेच संपुष्टात आले तर मानवाच्या परस्परसंबंधावरच ते घाला घालणारे आहे. आणखी महत्त्वाचे म्हणजे, आता जे शारीरिक श्रमाचे खेळ खेळले जातात, त्यांचे अस्तित्व किती टिकेल हादेखील प्रश्न आहे.
उसेन बोल्ट ज्या वेगाने धावला त्याचे कमालीचे आश्चर्य पुढच्या पिढ्यांना वाटत राहील. कारण एवढे श्रम पुढच्या काळात नसेल, अशी भीती आजच्या पिढीला नक्कीच वाटत राहणार. ई स्पोर्टसचे प्रस्थ वाढत असताना अन्य मैदानी खेळांची आजची परिस्थिती मात्र शोचनीय आहे. एशियाडमध्ये अनेक देशांतील पारंपरिक खेळ समाविष्ट झाले आहेत. रशियातील पारंपरिक खेळ सॅम्बो, दक्षिण-पूर्व आशियातील सेपाक टकरॉ, उझबेकिस्तानचा कुराश, इंडोनेशियाचा पिनाक सिलाट हे खेळ कधी पाहिले नसतील, पण आज ते एशियाडमध्ये समाविष्ट आहेत. याशिवाय पिनाक सिलाटसह ज्यूदो, जुजित्सू, कराटे, कुराश, सॅम्बो, पिनाक सिलाट असे अनेक मार्शल आर्ट खेळ एशियाडमध्ये समाविष्ट आहेत. मात्र, या खेळांच्या तुलनेत भारतीय पारंपरिक खेळही तितकेच कौशल्यपूर्ण असताना केवळ अंतर्गत धुसफूस व राजकारणामुळे ते एशियाडमध्ये समाविष्ट होऊ शकलेले नाहीत. जकार्तातील एशियाडमध्ये खो-खोचे फक्त प्रात्यक्षिक झाले. अन्य देशांच्या खेळांनी भारतात पाय रोवले असताना खो-खोचे अजून प्रात्यक्षिकेच सुरू आहेत. आता खेळांचे महत्त्व मोडीत काढणारा ई स्पोर्टसचा विळखा आवळत असताना कधी भारतीय खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर येतील आणि ते कधी इतर देश स्वीकारतील? तुमचे असेच चालूद्या… आम्ही आता ई स्पोर्टस खेळतो…!
चला खेळूया
Follow on Twitter @kheliyad
worth a though and necessary action
🙂 thanx for reply sir