आठवणीतल्या घोडके बाई!
शाळा : जीवन शिक्षण विद्यामंदिर
गाव : पिंपळगाव बसवंत
पागे बाई आणि घोडके बाई…. पहिली ते चौथीच्या काळातील या दोन शिक्षिका माझं आयुष्य समृद्ध करून गेल्या. त्यातल्या त्यात घोडकेबाई मला खूप चांगल्या आठवतात. सुमारे तीस वर्षांपूर्वीचं मला सगळंच काही आठवणार नाही; पण त्यांचं शिकवणं मला अजूनही आठवतं. आता ते धूसर होत चाललंय. मेमरी डिलीट होण्याच्या आत कुठे तरी स्टोअर करावं म्हणतोय.. म्हणूनच मी ते कुणाला तरी सांगतोय. ‘आटपाट नगर होतं’ या वाक्याने सुरुवात होणाऱ्या गोष्टी आठवतात. हा पतंग की पाखरू म्हणे मज आभाळी चल फिरू… या कवितेची चाल किती छान बसवली होती त्यांनी…! मी तर ही कविता इतकी छान सुरात म्हणायचो, की माझी मोठी बहीण मला नेहमी म्हणायला लावायची.
एकदा माझ्या मामाने टेपरेकॉर्डर आणला होता. त्या वेळी कोणीही काहीही बोललं, की रेकॉर्ड व्हायचं. काय कौतुक त्या यंत्राचं! त्या वेळी माझ्या बहिणीने मला आग्रह केला, ‘तू ती कविता म्हण. छान म्हणतोस.’ मला कोणी तरी चांगलं म्हटलेलं हेच ते पहिलं वाक्य. मी म्हंटली ती कविता. सर्वांसमोर सूर काही जमले नाहीत.. अर्थात, सूर कशाशी खातात हे तेव्हा माहिती नव्हतंच; आताही फारसं काही कळत नाही, पण सर्वांसमोर म्हणताना खूप लाजलो… तरीही म्हंटलो. माझ्या आयुष्यातलं पहिलं रेकॉर्डिंग. आता ती कॅसेट या धरणीत कुठे तरी गुडूप झाली असेल. घोडकेबाई आणि ही कविता या दोन्ही सारख्याच आठवतात…
बाईंना सांगायचंच राहिलं, की तुम्ही शिकवलेली कविता मला आजही लक्षात आहे… त्यांना एकदा भेटलोही होतो; पण पाचवीला होतो. फार मोठा काळ लोटला नव्हता, की भेटायलाच हवं; पण ओढ तीव्र होती. त्यामुळे मी स्वतःला किंचितसा नशीबवान समजतो. पण कविता आठवते हे सांगायला हवं होतं. कारण आपण शिकवलेलं विद्यार्थ्याच्या मनात तीस वर्षांनंतरही तितकच ताजं आहे हे ऐकून त्यांनी माझं किती कौतुक केलं असतं!!! शिक्षकी पेशातून निवृत्त झालेल्या व्यक्तीला यापेक्षा आणखी काय हवं असतं? आज घोडके बाई नाहीत आणि माझ्या मनातली ही कविता माझ्यापर्यंतच राहिली. त्यामुळेच मी स्वतःला दोषी मानत आलो आहे. कदाचित स्वतःला दोषी मानण्याची माझी सुरुवातच येथून सुरू होते.
त्या वेळी चौथीतून पाचवीत पाऊल ठेवलं नाही तर आम्हाला मराठी शाळेच्या आठवणींनी इतकं गलबलून आलं, की आम्ही थेट भेटायलाच गेलो. आता या शाळेत पुन्हा कधीच पाऊल ठेवणार नाही, हे पचवणंच जड झालं होतं. आताच्या काळात कपडे बदलाव्या तशा नोकऱ्या बदलतो, पण सोडलेल्या नोकऱ्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. त्या वेळी निरोपाची ही भेट आठवण्याचं कारण म्हणजे घोडके बाई. त्यांनी आम्हाला (मी आणि कीर्ती पटेल) मायेने आलिंगनच दिले.
मला आठवतं, शाळेच्या हजेरीपटावर सर्वांत पहिलं नाव माझं होतं. अभ्यासात नसलं तरी रजिस्टर झालेली हीच काय ती जमेची आठवण. त्या वेळी बाराखडीप्रमाणे क्रम नव्हतेच मुळी. त्यामुळेही असेल कदाचित. पण आता जेवढ्या अभिमानाने (मुद्दाम गमतीने बरं!) हे सांगतो, तेवढा अभिमान त्या वेळी अजिबात नव्हता. कारण पुढच्याचा पेपर पाहणं जेवढं सोपं असतं तेवढं मागच्याचा पेपर वळून पाहणं भयंकर धोक्याचं असतं. असो.. एवढं दुर्दैव सोडलं तर पहिली ते चौथीतला तो काळ मंतरलेला होता.
बाई गोष्टी सांगायच्या, गीतावरील चाल छान बसवायच्या. आमची शाळा दुपारी बारा ते पाच. बाईंचं पान खाणं आम्हा कुणालाही फारसं विशेष वाटत नव्हतं. मात्र, त्या पान खावून कुणावर संतापल्या तर तो लालजरक रंगलेल्या पानाचा विडा जणू आग ओकायचा…! त्या वेळी बाई भयंकर वाटायच्या. छातीत धडकी भरायची. असा प्रसंग माझ्याबाबतीत घडलेला नाही हे माझं सुदैव.
मला एक गंमत आजही आठवते. भयंकर हसू येतं. त्या वेळी बाई मुलींना कविता म्हणायला उभ्या करायच्या. त्या वेळी मुली उजवा पाय मागे करून फरशीवर एका तालात मागे हलक्याशा मारायच्या. तशा प्रकारचं ‘तालबद्ध’ (?) नृत्य अद्याप पाहण्यात आलेलं नाही. कदाचित कालौघात ते नृत्यही लोप पावलं असेल. राणी, सुनीता आणखी कोणी तरी मंजू की कोण, मुली फारशा आठवत नाहीत. ते राणीला माहिती असेल. पण या मुली उभ्या राहिल्या की एक पाय फरशीवर हलक्याशा धोपटायच्या. आता ते आठवलं, की फारच विनोदी वाटतं…
घोडके बाईंच्या आठवणी खूप आहेत. ही आठवणींची फुले आता ओंजळीत मावत नाहीत.. त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त ही सुमनांजली.
Mahesh farach sundar anubhav sangitle. Hi kavita itki god ahe ki aplya vayachya pratyek mulala ti athvat asel. Please be in touch .
मस्तच!
ही कविता पुन्हा ऐकायला मिळेल का?
कवी कोण होते?
आठवत नाही