कुस्तीप्रेमींना पडलेला प्रश्न… आखाडे कुस्तीचे की मस्तीचे?

महाराष्ट्राच्या कुस्तीला वैभवशाली परंपरा आहे. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या रूपाने ज्यांनी भारताला पहिले पदक जिंकून दिले त्या खाशाबा जाधव यांचा महाराष्ट्राच्या मातीला विसर पडत चालला आहे, अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अहमदनगरमध्ये कुस्ती स्पर्धेत कौशल्यापेक्षा आडदांडपणाचा खेळच अधिक रंगला. आखाड्याबाहेरच्या वादाने कुस्तीचे नुकसान होतच आहे, आता ती आखाड्यातही शिरकाव करीत आहे. आखाडे : कुस्तीचे की मस्तीचे, असा प्रश्न कुस्तीप्रेमींना पडला आहे. महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव व उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील यांच्यातील वादामुळे लढत थांबवण्यात आली असली तरी कुस्तीतली ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. मात्र त्यापासून बोध घेता येत नसेल तर त्यात कुस्तीचेच नुकसान आहे.
खेळात द्वेषभावनेला कोणताही थारा नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून कुस्तीत खुन्नस काढण्याचे प्रकार घडत आहेत, जे कुस्तीसाठी मारक आहेत. अहमदनगरमध्ये नरसिंग यादव व अतुल पाटील यांच्यातील कुस्तीलाही असाच रंग देण्यात आला होता. गेल्या वर्षी या दोघांत अकलूज येथे महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली होती. यात नरसिंग यादवने अतुल पाटीलला पराभूत करत महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला होता. नगरमधील स्पर्धेतही हेच दोघे आमनेसामने उभे ठाकल्याने स्पर्धेला दोन्ही मल्लांच्या सर्मथकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र दोन्ही मल्लांच्या सर्मथकांनी थेट आखाड्यातच उतरत दगडफेक सुरू केल्याने लढत थांबवण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिकही दोघांना विभागून देण्यात आले. मात्र यादरम्यान जो गदारोळ माजला तो संपूर्ण कुस्ती क्षेत्रासाठीच लाजिरवाणा ठरला. कुस्ती स्पर्धेतील हा गोंधळ नवा नाही. आखाडे कुस्तीचे की मस्तीचे, असा प्रश्न उपस्थित होण्यामागे आणखी काही उदाहरणे आहेत.
यापूर्वी नाशिकमध्ये राजेंद्र लोणारी विरुद्ध बीडचा केकाण, सईद चाऊस विरुद्ध विजय बनकर या महाराष्ट्र केसरीच्या लढती सर्मथकांच्या हुल्लडबाजीमुळेच गाजल्या. नगरमधील घटनेमुळे नरसिंग यादवने नगरमध्ये पुन्हा न खेळण्याचा निर्णय उद्विग्नपणे घेतला. यापूर्वी सईद चाऊसलाही अशाच वादाचा फटका बसला होता. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेतील पदाधिकार्यांचे वाद निवडणुकीमुळे चव्हाट्यावर आले होते. आता खेळाडूंमधील वादही उफाळून येत असतील तर कुस्तीची ‘माती’ होण्यास वेळ लागणार नाही. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेकडे नियमावली आहे. मात्र तिची कडक अंमलबजावणी झाली तर अनेक मल्ल स्पर्धेतून बाद होतील. केवळ खेळ टिकावा म्हणून नियमांचे फास आवळले जात नसले तरी खेळाडूंनीच आपली आचारसंहिता ठरवून घेतली पाहिजे.
वादांनी रंगलेले कुस्त्यांचे आखाडे
- जून 2009 : जळगावात खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत मल्लाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण गाजले होते. हा मल्ल परराज्यातला होता. त्या वेळी त्याने, आपल्याला धमकावल्याचा आरोप केला होता. जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले.
- डिसेंबर 2009 : पुण्यातील सांगवी येथे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे काही वेळ थांबवावी लागली होती. बीडचा सईद चाऊस व विजय बनकर यांच्यात पुन्हा लढत झाली. यात सईद चाऊसला पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेनंतर चाऊसने दमदाटी व धाकदपटशा दाखवून आपल्याला हरवण्यात आल्याचा सनसनाटी आरोप केला होता. यावर डबल महाराष्ट्र केसरी झालेल्या चंद्रहार पाटीलनेही स्पर्धेतील नियोजन व पक्षपातीपणाबद्दल थेट आरोप केले होते.
- जानेवारी 2012 : नाशिक फेस्टिव्हलअंतर्गत भुजबळ केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत नांदगावचा कमलेश सांगळे व नाशिकचा संदीप दरेकर यांच्यातील लढत सर्मथकांच्या हुल्लडबाजीमुळे थांबवण्यात आली. दोन फेर्यांत दोन्ही मल्लांनी एक-एक फेरी जिंकल्यानंतर हा गोंधळ झाला होता. वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही दोन्ही गट ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे दोन्ही मल्लांना पारितोषिक विभागून देण्यात आले. दहा-बारा वर्षांपूर्वी नाशिकमध्ये येवल्याचा राजेंद्र लोणारी व बीडचा केकाण यांच्यातील लढतही प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीने गाजली होती. यात येवल्याच्या लोणारीला पराभव स्वीकारावा लागला होता.