थुलथुलीत देहाचेच का असतात सुमो पहिलवान ? (भाग 1)
गातील अनेक खेळ ग्लोबल झाले असले तरी जपानचा सुमो हा एकमेव खेळ असा आहे, की जो ग्लोबल झाला नाही. त्यामुळेच हा पारंपरिक खेळ फक्त जपानमध्येच व्यावसायिकपणे खेळला जातो. असं म्हंटलं जातं, की हा खेळ जेंडाई बुडो (gendai budo) अर्थात आधुनिक जपानी मार्शल आर्टचाच प्रकार आहे. मात्र, ते चूक आहे. कारण हा खेळ अनेक शतकांपासून खेळला जाणारा प्राचीन खेळ आहे. अनेक प्राचीन परंपरांमुळे सुमो संरक्षित राहिलाच, शिवाय आधुनिक युगातही सुमोच्या प्राचीन परंपरा जपल्या जात आहेत. उदाहरणार्थ- मिठाने सुमो कुस्तीच्या आखाड्याचे (दोह्यो)शुद्धीकरण करणे इ. शिंतो धर्मात जेव्हापासून सुमो कुस्ती सुरू झाली तेव्हापासून आजतागायत ही परंपरा कायम आहे. जपान सुमो असोसिएशनच्या नियम-अटींचे काटेकोरपणे पालन केले जाते.
सुमो कुस्तीचा इतिहास जपानइतकाच प्राचीन आहे. आठव्या शतकापूर्वीपासून सुमो कुस्ती अस्तित्वात होती. यापूर्वी हा खेळ ‘सुमाई’ या नावाने ओळखला जात होता. सुमोचा इतिहास खोदून काढायचा असेल तर सुमारे १५०० वर्षे मागे जावे लागेल. यायोई कालखंडापासून (इसवीसनपूर्व ३००) पारंपरिक पद्धतीने हा खेळ खेळला जातो. जगातील सर्वांत प्राचीन समजल्या जाणाऱ्या या खेळाला इडो कालखंडात (1603 आणि 1868) व्यावसायिक स्वरूप आले. कालानुरूप यात काही बदल झाले असले तरी परंपरेनुसार चालत आलेल्या या खेळाच्या पद्धतीत मात्र फारसे बदल झालेले नाहीत. भारतात पहिलवान बनायचे असेल तर अनेक आखाड्यांत निवासी प्रशिक्षण दिले जाते.
महाराष्ट्रात जसे कोल्हापूर कुस्तीचे माहेरघर म्हंटले जाते किंवा पंजाबमध्ये धूमछडी आखाडा प्रसिद्ध आहे, तसे सुमो पहिलवानांसाठी जपानमध्ये अनेक प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्याला जपानमध्ये ‘हेया’ म्हणतात. ‘हेया’मध्ये परंपरांचे कठोर पालन केले जाते. भोजनापासून पारंपरिक पोशाखापर्यंत ही परंपरा पाहायला मिळते. प्राचीन परंपरांचे काटेकोर पालन करीत जपानमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेल्या शिस्तबद्ध सुमो कुस्तीलाही ‘मॅच फिक्सिंग’, भ्रष्टाचाराची कीड लागली. म्हणजे भ्रष्टाचाराची देणगी केवळ ग्लोबल खेळांनाच नाही हे सुमो कुस्तीने अलीकडेच २०११ मध्ये एका घोटाळ्याने सिद्ध केले. यामुळे सुमोविश्वात मोठी खळबळ उडाली होती. अनेक हायप्रोफाइल मल्ल या घोटाळ्यात अडकले होते.
कशी असतो सुमो रिंग?
कुस्तीचा जसा आखाडा असतो तसा सुमोचाही असतो. मात्र, त्याला ‘दोह्यो’ (dohyo) असे म्हणतात. हा दोह्योचा आकार ४.५५ मीटर (१४.९ फूट) व्यासाचा असतो, तर एकूण एरिया १६.२६ स्क्वेअर मीटर (१७५ स्क्वेअर फूट) एवढा आहे. या दोह्यामध्ये २० गोण्या तांदळाच्या भुश्याचा वापर करतात. या भुश्यात माती आणि वाळूचे मिश्रण असते. बाउटमध्ये लढती पुकारणाऱ्यास ‘योबिदाशी’ (बाउट कॉलर) म्हणतात. दोह्योच्या मध्यावर दोन पांढऱ्या रेषा आखल्या जातात. त्याला शिकिरी-सेन (shikiri-sen) असे म्हणतात. या दोन्ही रेषांच्या बाजूला सुमो पहिलवान लढतीसाठी सज्ज होतात. दोन सुमो पहिलवानांची ही झुंज आपल्याकडील कुस्तीसारखी अजिबात नाही. एकमेकांना दोह्योच्या बाहेर ढकलायचे. जो पहिलवान खाली पडेल तो हरला, असे या लढतीचे स्वरूप असते. हा आखाड्याचे मिठाने शुद्धीकरण करण्याचीही एक परंपरा आहे.
असे घडतात सुमो पहिलवान
जपान सुमो असोसिएशन ही सुमो पहिलवानांची सर्वोच्च संघटना आहे. या संघटनेचा सदस्य ओयाकाटा (oyakata) असे संबोधले जाते. ते सर्व पहिलवानच असतात. मात्र, ते अधिकृत वस्ताद म्हणून ओळखले जातात. सुमो पहिलवान घडविण्यासाठी जपानमध्ये विविध तालमी आहेत. जपानमध्ये या तालमींना स्टेबल किंवा हेया (heya) असे म्हणतात. ओयाकाटा म्हणजेच वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली सुमो पहिलवानांचे प्रशिक्षण होते. जपानमध्ये 2007 मध्ये 43 तालमींतून (हेया) 660 पहिलवान प्रशिक्षित झाले होते. सुमो पहिलवानांना शिकोना (shikona) असे म्हंटले जाते. हे त्यांच्या मूळ नावाशी संबंधित असतेच असे नाही.
‘दोह्यो’ मिठाने का शुद्ध करतात?
जपानमध्ये प्राचीन काळापासून मिठामध्ये शुद्धीकरणाची शक्ती मानलेली आहे. दोन सुमो पहिलवान बाऊटमध्ये येण्यापूर्वी हवेत मीठ फेकतात. त्यामागे स्थान पवित्र होते अशी भावना असते. वाईट आत्म्यांपासून संरक्षण करण्यासाठी आखाड्याच्या प्रत्येक दिशांना मीठ टाकले जाते आणि शरीर स्वच्छ राखण्यासाठी जल प्राशन केले जाते. प्रत्येक प्रथा धार्मिक अनुष्ठान असते.
सुमो पहिलवानांची श्रेणी
सुमो पैलवान होणं येऱ्यागबाळ्याचं काम नाही. त्यात सुमो पहिलवान म्हंटलं, की शरीरापासून मेहनतीपर्यंत सगळंच आवाक्याबाहेर! पराकोटीची शिस्त आणि व्यायामाने या मल्लांची जडणघडण होत असते. बरं, यात फक्त पैलवान असून काम नाही, तर कामगिरीही महत्त्वाची असते. कारण कामगिरी असेल तर अव्वल विभागात या मल्लांची वर्णी लागते. या विभागानुसार या मल्लांचा मग पगार निघतो.
तर आधी हे विभाग समजून घेऊ…
सुमो पहिलवानांचे सहा विभाग किंवा श्रेणी असतात. ते असे- 1. माकुची (Makuuchi), 2. जुऱ्यो (Juryo), 3. माकुशिता (Makushita), 4. सँडॅम (Sandanme), 5. जुनिडान (Jonidan), 6. जोनोकुची (Jonokuchi) माकुची हा सुमो पहिलवानांचा सर्वोच्च विभाग. या विभागात 42 पहिलवानांचा सहभाग असतो. कामगिरीनुसार या पहिलवानांच्या वेगवेगळ्या रँक प्रदान केलेल्या असतात. बरं या विभागात कामगिरीनुसारच दाखल होता येते. कामगिरी खालावली की विभागही खालावतो. त्यामुळे कोणीही या विभागात कायमस्वरूपी स्थान मिळवू शकत नाही. या विभागात वेगवेगळ्या रँक असतात. प्रत्येक रँकमध्ये 8 किवा 12 पहिलवान असतात. यातली सर्वोच्च रँक योकोझुना आहे. योकोझुना रँकची स्पर्धा जिंकल्यास पहिलवानाला 90 हजार अमेरिकी डॉलरपर्यंत बक्षीस मिळतं. ओझेकी, सेकिवेक आणि कोसमुसुबी या आणखी काही रँक आहेत, ज्या जिंकल्या तर भरघोस बक्षिसांची लयलूट होते. याशिवाय प्रायोजकांचं बळ वेगळंच. या विभागातील पहिलवानांना महिन्याला पगार असतो. मात्र कामगिरी घसरली की पगार विसरायचा बरं.
जुऱ्यो (Juryo) जुऱ्यो हा दुसऱ्या क्रमांकाचा विभाग. यात 28 पहिलवानांचा समावेश असतो. या विभागात पोहोचल्यावर पगाराची अपेक्षा करता येऊ शकेल. या विभागातही महिन्याला पगार मिळतो. इतर सवलती वेगळ्याच. जुऱ्यो स्पर्धेतील विजेत्यालाही घसघशीत बक्षीस मिळतं. ते साधारण कोटीच्या रकमेतही असू शकतं. अर्थात सुमो संघटनेकडून या विभागांचे पगार जाहीर केले जात नाहीत. या विभागात पोहोचलेल्या मल्लाला प्रत्येक अधिकृत स्पर्धेत किमान 15 लढती खेळाव्या लागतात. माकुची आणि जुऱ्यो हे दोनच सर्वोच्च विभाग असे आहेत, की जेथे पहिलवानांना पगार मिळतो. उर्वरित चारही विभागांत काहीच मिळत नाही. सुमारे साडेसहाशे पहिलवान एकमेकांसमोर उभे ठाकतात. यातील फक्त 60 मल्ल वरच्या श्रेणीत जातात. सर्वोच्च श्रेणीत जायचे असेल तर सलग दोन-तीन वर्षे जिंकणे आवश्यक आहे. कारण जिंकलं तरच पगार मिळतो.
हेही वाचा…. सुमो कुस्तीला भ्रष्टाचाराची कीड
सर्वोच्च माकुची श्रेणीतील पहिलवानाला 60 हजार डॉलर म्हणजेच महिन्याला 45 ते 50 लाखांपर्यंत पगार मिळतो. त्या खालोखाल दुसऱ्या श्रेणीतील मल्लाला आठ ते नऊ लाख रुपये प्रतिमहिना वेतन मिळते. य़ाशिवाय प्रायोजकांकडून मिळणारे मानधन, सुविधा वेगळ्याच. माकुशिता (Makushita) ही तिसऱ्या क्रमांकाची डिव्हिजन. सध्याच्या नियमानुसार या विभागात 120 पहिलवानांचा समावेश असतो. हे पहिलवान एका स्पर्धेत एकमेकांशी फक्त सात वेळा स्पर्धा करू शकतात. व्यावसायिक पहिलवान होण्याची ही पहिली पायरी मानली जाते. यात कोणताही आर्थिक लाभ नसतो.
उर्वरित श्रेणींमध्येही हीच स्थिती असते. पहिल्या दोन श्रेणींमध्ये किमान काही सवलती तरी असतात. मात्र, उर्वरित चार श्रेणींमध्ये तुम्ही ना मोबाइल वापरू शकता, ना गर्लफ्रेंड. या प्रत्येक श्रेणी पहिलवानांसाठी आणखी बरेच जाचक नियम आहेत. एखादा पहिलवान जखमी झाला तर त्याची श्रेष्ठता श्रेणी घसरते. मग पुन्हा वरच्या श्रेणीत यायचे असेल तर त्याला पुन्हा तालमीत प्रवेश घ्यावा लागतो आणि तालमीत जायचं म्हणजे पत्नी, मुलांना सोडणे आलेच. त्याशिवाय तालमीत प्रवेश दिलाच जात नाही.
सुमो पहिलवानांची लाइफस्टाइल
सुमो पहिलवानांची लाइफ स्टाइल थोडी हटके असते. म्हणजे पारंपरिक जपानी माणसाचा पेहराव पहिलवानाला असतो. ज्युनिअर गटातील पहिलवान जाडे सुती कपडे व पायात लाकडी सँडल परिधान करावे लागतात. सर्वोच्च श्रेणीतील पहिलवान कार वापरू शकतात, पण ती अजिबात चालवू शकत नाही. कारण त्यांचा पोटाचा घेरच इतका मोठा असतो, की स्टेअरिंग आणि सीट यांच्यामध्ये ते घुसूच शकत नाही. त्यासाठी प्रत्येक कारमालक पहिलवान नोकरीवर एक ड्रायव्हर ठेवतो. ती एक प्रतिष्ठेची बाबही समजली जाते.
आहार…
हा सर्वांत महत्त्वाचा विषय. थुलथुलीत व अवाढव्य देहाचे सुमो पहिलवानांचा आहार किती असेल, याचं अनेकांना कुतूहल असतं. या पहिलवानांचा अजस्र देह पाहता त्यांचे भोजनही तेवढेच मजबूत असते. असे असले तरी ते दोनच वेळा जेवण करतात. या पहिलवानांची एक विशेष जपानी डीश असते. तिला चांको-नाबे असे म्हणतात. या भोजनातून त्यांना तब्बल 20 हजार कॅलरी मिळतात. ही डीश आधी समजून घेऊया. ताजा भाजीपाला, मटण, मासे, टोफू आणि नूडल्स हे एकत्रितपणे उकडून जो आहार तयार होतो, त्याला चांको-नाबे डीश म्हणतात. ही डीश एकप्रकारे सूप म्हणूनच सेवन केली जाते. सुमो पहिलवानांचा मुख्य ऊर्जास्रोत हीच ‘चांको-नाबे’ डीश आहे. हा आहार ठराविक रेस्टॉरंटमध्येच मिळतो. विशेषतः सुमो स्टेडियममध्ये हे हॉटेल असतात. एका स्टे़डियममध्ये असे 20 पेक्षा अधिक हॉटेल असतात. बरं ही हॉटेल चालविणेही येऱ्यागबाळ्याचे काम नाही. या हॉटेलांचे मालक सुपरस्टार सुमो पहिलवानच असतात. एकूणच काय, तर पहिलवानांचा आहार दुसरा पहिलवानच जाणो.
सुमो पहिलवानांविषयीच्या या 7 गोष्टी तुम्ही कधी वाचल्या नसतील… |
1. लहानपणापासूनच सुमो पहिलवानांना कडक शिस्तीत प्रशिक्षण दिलं जातं. वयाच्या १६ व्या वर्षी सुमो पहिलवान तयार होतो. त्यांचे थुलथुलीत शरीर पाहिल्यानंतर वाटतं, की हे नुसतं खादाडत असतील. पण असे मुळीच नाही. ते दिवसातून फक्त दोन वेळा जेवण करतात. |
सुमो पहिलवान दिवसातून फक्त दोन वेळा भोजन करीत असले तरी ते एका दिवसात १० ते २० हजार कॅलरीपर्यंत भोजन घेत असतात. आपण दिवसभरात पाच वेळा जेवण केले तरी जास्तीत जास्त २००० कॅलरी मिळवू शकतो. त्यामुळे १० हजार कॅलरी भोजन पचविणे सोपे मुळीच नाही. |
त्यांच्या भोजनात जास्तीत जास्त मांसाहार असतो. त्यात फ्राय केलेले फिश आणि राइसचा समावेश असतो. मोठमोठे पातेलेभरून पालेभाज्यांचे सूप ते काही मिनिटांत फस्त करतात. |
भोजनाची मात्रा जास्त असल्याने सुमो पहिलवानांना श्वास घेणे अवघड जाते. त्यामुळे झोपताना ते ऑक्सिजन मास्क लावूनच झोपतात. |
त्यांची दिनचर्या आणि अतिभोजन केल्याने त्यांचे आयुष्य इतरांच्या तुलनेने कमी असते. एका अहवालानुसार, एका साधारण मनुष्यापेक्षा सुमो पहिलवानाचे आयुष्य दहा वर्षांनी कमी असते. |
सुमो पहिलवान घडण्यासाठी वयाचे बंधन असते. म्हणजे तालमीत दाखल होण्यासाठी 15 ते 23 वर्षे वयोगटातील मुलेच प्रशिक्षण घेऊ शकतात. 23 वर्षांंपुढील वयोगटाला तालमीत थारा नाही. |
परदेशी नागरिकाला सुमो तालमीत प्रवेश मिळणं कठीणच आहे. कारण एका तालमीत एकच परदेशी नागरिक प्रशिक्षण घेऊ शकतो. एकदा प्रवेश मिळाला, की तुमच्यावर आपादमस्तक जपानी संस्कार आपोआप घडतात. म्हणजे जपानी भाषाच बोलायची, आहारही जपानी पद्धतीचा, पेहरावही जपानीच. |
येथे पाहा सुमो कुस्तीची झलक…
क्रमशः
NICE
thank you