Literateur

‘गुलजार’ मनाचा वेध

‘गुलजार’ मनाचा वेध

मला गुलजार यांच्या कविता, गझला ऐकल्या नाही तर तो दिवस ‘गुलजार’ वाटतच नाही. उगाचच त्यांच्या गझलेतला अर्थ शोधत असतो. गझलेतला अर्थ शोधू नका, नाही तर अडचण होईल, असं प्रसिद्ध शायर राहत इंदुरी म्हणतात. पण गुलजार यांच्या ‘मैं वहीं हूँ’मध्ये मी काही तरी शोधत होतो. त्यातलाच हा छोटासा प्रयत्न… आवडलं तर ब्लॉगवर अवश्य लिहा….


महेश पठाडे
rhythm00779@gmail.com
mob. 8087564549

हाटेची अंधारलेली वाट. मधूनच कोंबडा आरवतो, तर दूर कुठे तरी गाय हंबरते. कुत्री मोठमोठ्याने भुंकत असतात. गुलाबी थंडीचे ते दिवस. धुके मात्र अजूनही दाटलेले असते. गावातलं हे झुंजुमुंजू वातावरण कधी तरी अनुभवलेलं असतं. हे मी अनुभवलंय अगदी ८०-९० च्या दशकात. पण त्याआधीही अगदी तीस-चाळीस वर्षे मागे गेलं तर ते कसं असेल? मी पाहिलेली गावातली घरंही कशी लाकडी दरवाजांची आणि भिंती मातीच्या. चार-पाच शृंखलांची लोखंडी कडी. आतासं अनेक गावांचं रूपडं बदललेलं आहे. पण एखाद्या कवितेतून, गझलेतून हे हरवलेलं गाव डोळ्यांसमोर अलगदपणे उभं राहतं आणि गावातली ती साधी राहणी आणि कमालीचं पेशन्स असलेली माणसं डोळ्यांसमोरून तरळून जातात.

गुलजार यांची ‘मैं वहीं हूँ’ ही गझल ऐकताना माझ्या कल्पनेत असंच एक गाव उभं राहिलं, ज्या गावात कमालीचा साधेपणा होता. म्हणूनच मला गुलजार यांच्या कविता, गझला ऐकल्या नाही तर तो दिवस ‘गुलजार’ वाटतच नाही. उगाचच त्यांच्या गझलेतला अर्थ शोधत असतो. गझलेतला अर्थ शोधू नका, नाही तर अडचण होईल, असं प्रसिद्ध शायर राहत इंदुरी म्हणतात. पण गुलजार यांच्या ‘मैं वहीं हूँ’मध्ये मी काही तरी शोधत होतो. कदाचित ते हरवलेलं गाव असेल. न सापडणारं. गुलजार यांनी मात्र हे हरवलेलं गाव आणि त्या गावातली एक तरल प्रेमकहाणी इतकी सुरेख चितारलीय, की फक्त म्हणावंसं वाटतं, क्या बात है…!

गुलजार म्हणतात,

जब सिरहाने बुझ रहा था रातभर जलकर दिया
देर तक बैठी रही खिडकी पे मैं बैठी रही
सुबह के हलके गुलाबी कोहरे से गुजरा मुसाफिर
मेरे दरवाजे पे आकर रुक गया, पूछा मुझे
वो कहाँ है, वो कहाँ है
मै मारे शर्म के कह ना सकी
मैं वहीं हूँ, मैं वहीं हूँ
मैं वहीं हूँ, मैं वहीं हूँ वो मेरे मुसाफिर

हे ऐकलं आणि मी स्वतःलाच हरवून बसलो. मला कळलंच नाही, की मी मोबाइल, इंटरनेटच्या अशा युगात आहे, जेथे अशा भावना चुकूनही कोणी व्यक्त करणार नाही. ‘जब सिरहाने बुझ रहा था रातभर जलकर दिया…’ (आजच्या परिस्थितीत सांगायचं म्हणजे, किचनमधला लाइट स्विचऑफ झाला किंवा विजेच्या कमी दाबाने डीम तरी झाला…) या ओळीत कमालीची जादू आहे. मी तर ठारच झालो. म्हणून मला वाटतं, हा गुलजार यांचा पन्नासच्या दशकातला काळ असेल. (ही फक्त कल्पना.) ही एक तरल प्रेमकहाणी आहे. दोन जिवांमधली अस्वस्थता. एकमेकांविषयी कमालीची ओढ; पण दोन्ही बाजूंनी मर्यादा किती उच्च पातळीच्या! त्या वेळी अर्थात लाइट नावाचा कृत्रिम उजेड नव्हताच. सायंकाळी दिवेलागण व्हायची. तिने माजघरात दिवा पेटवला असेल. रात्रभर तो तेवत असताना पहाटे तो मिणमिणता झाला… पण हे सगळं सांगताना गुलजार यांनी इतकी सुंदर रचना केली, की ते ऐकताना माझ्या डोळ्यांसमोर ते घर, ती मुलगी, तो मुसाफीर दिवाना, त्यांच्यातली ती घालमेल… हे सगळं डोळ्यांसमोर जसंच्या तसं उभं राहिलं. घरात ती एकटी असते. तिला कधी तरी त्याने पाहिलेलं असतं. तिनेही त्याला गुलाबी थंडीत धुक्यात कुठे तरी पाहिलेलं असतं. मात्र, ती इतकी लाजते, की ती काहीच बोलत नाही. कधी तरी झालेली ही धूसर नजरानजर दोघेही डोळ्यांत साठवतात. मग ती त्याला बाहेर कधीच दिसत नाही. तो अस्वस्थ होतो. तो तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर झालेला असतो. तिच्या आठवणींनी त्याची झोप उडते.. किती वाजले माहीत नाही. मग तो अनाहूत मुसाफीर धाडस करतो आणि तडक तिच्या घराच्या दरवाजाजवळ उभा राहतो. मनात मात्र निःशब्द भावना.. इतका तो सिंपल दिवाना होता. वाटत खूप होतं, की बेधडक विचारावं. पण सगळं मनातच राहतं. त्याचं हे मन सारखं विचारत असतं, ती कुठे आहे, जिला मी पाहिलं होतं… तिलाही त्याची चाहूल जाणवते. त्याच्या त्या आवाजातली अनामिक ओढ तिला कळते. पण ती काहीच बोलत नाही. त्याच्या मनातल्या अव्यक्त प्रश्नानेच ती कमालीची लाजते. गुलजार यांनी ही दोन जिवांची प्रेमकहाणी इतक्या उच्च पातळीवर नेली आहे, की विचारू नका. ती इतकी लाजली, की ती काहीच बोलू शकली नाही. हो, मी तीच आहे. मी तीच आहे. हे माझ्या मुसाफिरा, मी तीच रे…! हे तिचे शब्द तिच्या मनातच राहिले.

श्याम आयी जब सिरहाने पर जलाना था दिया
देर तक बैठी रही खिडकी पे मैं बैठी रही
श्याम की सुर्खी में रथ पर लौटकर आया मुसाफिर
धूल थी कपडों पर दरवाजे पे फिर पूछा मुझे
वो कहाँ है, वो कहाँ है
मैं ही मारे शर्म के कह ना सकी
मै वही हूँ, मै वहीं हूँ
मैं वही हूँ, मैं वही हूँ वो मेरे मुसाफिर

आता सूर्य मावळतीकडे झुकत असतो. पण तिला त्याचं प्रेम स्वस्थ बसू देत नाही. ती सायंकाळ उगाचच तिच्याशी घुटमळत राहते. दिवेलागणीची वेळ झाल्याचंही तिच्या लक्षात येत नाही. ती तशीच खिडकीजवळ बसून राहते. त्याच्या विचारांत गढून जाते. माझ्या डोळ्यासमोर ती खिडकी, तिचं ते विचारांत गढून जाणं तरळून जातं. ती खिडकी लोखंडी आडव्या सळ्यांची असेल. बाहेर सायंकाळचं ते वातावरण आणि घरात दाटत चाललेला अंधार जाणवत राहतो. ती खिडकीखाली भिंतीला पाठ टेकवून बसलेली असते. अशा या सायंकाळच्या वातावरणात तो पुन्हा येतो… कपडे धुळीने मळलेले. (आजच्या तरुणीची अशी ही मनोवस्था चितारायची झाली तर जीन्स-टी शर्ट, डोळ्यांवर गॉगल चढवलेला तरुण आलिशान कारमधून आपल्याकडे येतोय… असं काही तरी जाणवेल…) तिला त्याचं निर्मळ आणि स्वच्छ मन कळलेलं असतं. म्हणूनच तिच्या मनात बाह्यांगाला कोणताही थारा नसतो. तो पुन्हा दरवाजाजवळ येतो. टक टक न करता उभा राहतो. तो म्हणतो, ती कुठे आहे? ती कुठे आहे? पुन्हा ती लाजून चूर होते. ती काहीच बोलत नाही. मी तीच आहे. मी तीच आहे. हे माझ्या मुसाफिरा, मी तीच रे….! हे शब्द पुन्हा तिच्या मनातच राहिले.

बारिशों की रात है, कमरे में जलता है दिया
फर्श पर बैठी हूँ खिडकी के तले
और अंधेरी रात में अब गुणगुणाती रहती हूं
मैं वही हूँ, मैं वही हूँ
मैं वही हूँ वो मेरे मुसाफिर

ही तरल प्रेमकहाणी एक-दोन दिवसांची नाही, तर अनेक वर्षांची, निरंतर सुरू असते. आता पावसाचे दिवस असतात. मुसळधार पावसाने सगळे अंगण चिंब होते… छतावरून पाण्याची धार अव्याहतपणे वाहत असते. या पावसातली रात्रही तिला अस्वस्थ करीत राहते. बाहेर कडाडणारी वीज तेवढी लख्खपणे काही क्षणांपुरती अस्तित्व दाखवते… घरातल्या खोलीत दिवा तेवत असतो. पुन्हा ती खिडकीखाली बसते. डोक्यात फक्त त्याचेच विचार. त्याचा तो अस्वस्थ करणारा प्रश्न… ती कुठे आहे, ती कुठे आहे… विजांसारखा मनात चमकत राहतो… दिव्याची ज्योत मधूनच फडफडते. ती त्या दिव्याकडे फक्त पाहत राहते. ती घरात एकटीच असते. मग ती स्वतःशीच बोलू लागते. धाडसाने म्हणते, मी तीच आहे. मी तीच आहे. हे माझ्या मुसाफिरा, मी तीच रे….


हेही वाचा…
अहंकारी धनुर्धारी

Related Articles

One Comment

  1. खूपच छान रसग्रहण केलंस महेश..गुलजार लिखाण झालंय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!