माझ्या आठवणीतलं केटीएचएम
केटीएचएम | KTHM | म्हणजे कांदे-टमाटे- हिरव्या- मिरच्या, असं गमतीने म्हंटलं जायचं. पण खरं सांगायचं म्हणजे, हे सर्व एकत्र केलं तर चांगला झणझणीत ठेचा होतो. जेवणाची मजा तर यातच आहे. माझ्या आठवणीतलं केटीएचएम…
केटीएचएम कॉलेजमध्ये शिकण्याची मजा काही वेगळीच होती. मला आठवतं, किरण, पारस, मिलिंद… आम्ही क्रिकेट भरपूर खेळलो.सगळ्यात भारी मजा मिल्यासोबत खेळताना आली. असं क्रिकेट आताही कोणी खेळत नसेल, जे आम्ही खेळलो! अकरा जणांच्या संघाला आम्ही दोघे चॅलेंज करायचो. जो मॅच हरेल तो टेनिसबॉल देईल किंवा दोनपाचशे रुपये तरी देईल. खरं तर ही पूर्णपणे मिल्याचीच आयडिया. मग बाकीचे नऊ मुलं आणायची कुठून? आम्ही केटीएचएमच्या आवारात टोळक्या टोळक्याने बसलेल्या प्रत्येकाला आवाहन करायचो, तुला येतं का खेळतं? असं विचारत सर्वांना गोळा करायचो आणि एक संघ तयार व्हायचा. कुणाला बॉलिंग येते, बॅटिंग येते किंवा नाही येत… काहीच माहीत नसायचं. तरी असल्या ओबडधोबड संघाकडून आम्ही जिंकायचो. माझ्या आयुष्यातलं सर्वांत हॉरिबल क्रिकेट… कारण वाद झाले तर मिल्या खंबीर असणे हाच एकमेव दिलासा होता.
किरणसोबत खेळलो; पण किरणला एक भयंकर खोड होती, ती म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घ्यायची… माझी बॉलिंग किती भारी… च्यायला, याने लई येड्यासारखे रन दिले… वगैरे वगैरे… पण तो सर्वांसोबत असायचा. किरणला संतापलेलं कधी पाहिलं नाही… एकदम कूल. तो मित्र म्हणून ग्रेटच. आम्ही दोघे तसे जुनेच मित्र. म्हणजे केटीएचएमच्याही आधी आमची ओळख होती. किरण, मिल्या…. खूप वाटतंय क्रिकेट खेळावंसं.. किमान फिटनेससाठी तरी..!
पारस म्हणजे आमचा पाऱ्या…! अचानक गेला निघून. मला कालपरवा; कळलं. त्याचं जाणं संतापजनकच. अरे चाळिशी हे काय जाण्याचं वय आहे? खूप चांगला मित्र आम्ही गमावला. मी मटामध्ये आलो, तेव्हा जुन्या मित्रांपैकी पहिल्यांदा पारसचाच फोन आला. मला म्हणाला, महेश, मला मटात सदर सुरू करायचंय. मी म्हंटलं, कशावर? तो म्हणाला, अरे अनेकांना कायदे माहितीच नाहीत. त्यांना माझ्या लेखनातून कळेल, की कायदे काय असतात ते! मला तर भयंकर आनंद झाला. मी म्हंटलं, तू लेख तयार ठेव. मी विचारून सांगतो. हा संवाद तेथेच संपला. मी त्याला नंतर अनेकदा फोनही केले. पण आमचं भेटणं कधीच झालं नाही. नंतर तर त्याचा नि माझा संपर्कच राहिला नाही. पण नेहमी वाटायचं, जावं एकदा पाऱ्याला भेटायला… आता ती भेट होणार नाही याची सल मला कायम बोचत राहील. आपल्यासोबत असलेला एक पापभिरू मित्र अरविंद निऱ्हाळीही असाच अचानक गेला. त्या धक्क्यातून आम्ही कुठे तरी सावरत नाही तर पाऱ्याने आम्हाला भयंकर अस्वस्थ केलं. अतिशय बिंधास्त आणि तितकाच बेफिकीर. पण मनमिळावू. आम्ही दोघे बऱ्याचदा बोटिंग करायचो, तेव्हा तो माझ्याशी रेस लावायचा. बऱ्याचदा तोच जिंकायचा. पण आयुष्याच्या लांबीत तो माझ्यापेक्षा कमीच पडला; पण तो जिंकला की हरला, काही कळत नाही… बरंच बोलायचं होतं पाऱ्याशी. पण त्याने त्याला साजेशा अशा बेफिकिरीची पावती दिली. जा पाऱ्या… नको भेटू… आमचाही तुला गूड बाय…!
[jnews_block_37 header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”112″]