Jagjit Singh Life Story | जगजितसिंग यांचे परदेशातील लाइव्ह कॉन्सर्ट प्रचंड लोकप्रिय असायचे. लोकांना तिकीट मिळत नव्हते इतकी प्रचंड गर्दी असायची. त्याची प्रचीती लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये आली. 1981 मध्ये हा कार्यक्रम होता. या अल्बर्ट हॉलची क्षमता सहा हजार प्रेक्षक क्षमतेची होती. बर्मिंगहॅमसह अनेक ठिकाणाहून प्रेक्षक आले होते. विश्वास बसणार नाही, पण अनेकांना तिकीट मिळाले नाही म्हणून माघारी फिरावे लागले. गिटारवर क्लेरन्स पीटरसन यांनी त्या वेळी साथसंगत केली होती. या आठवणींना त्यांनी एके ठिकाणी उजाळा दिला होता. हा कार्यक्रम सुपरहिट झाल्याने पुढे 1982 मध्ये याच कार्यक्रमाचा अल्बम काढण्यात आला. तो म्हणजे ‘लाइव्ह अॅट दि रॉयल अल्बर्ट हॉल.’ वाढत्या लोकप्रियतेमुळे जगजितसिंग हुरळून कधीच गेले नाही. गझल गायकीवर आणखी लक्ष देत अनेक गझलांना संगीत देण्यात ते व्यस्त झाले. 1982 मध्येच त्यांचा आणखी एक अल्बम निघाला- ‘दि लेटेस्ट’.
लबों से लब जो मिल गए
लबों से लब ही सिल गए
सवाल ग़ुम जवाब ग़ुम
बड़ी हसींन रात थी।
त्यानंतर जगजितसिंग यांचे एकापाठोपाठ अल्बम आले आणि सुपरहिट झाले. 1983 मध्ये ‘कृष्णा’, 1984 मध्ये ‘एक्स्टॅसिज.’ त्यांच्या बहुतांश अल्बमची नावे इंग्रजीत असायची. त्याचे कारण म्हणजे विदेशातली लोकप्रियता.
हम को दुश्मन की निगाहों से न देखा कीजे
प्यार ही प्यार हैं हम, हम पे भरोसा कीजे
चित्रासिंग | Chitra Singh | यांच्या आवाजातील ही नज्म अप्रतिमच. जगजितसिंग यांनी कंपोज केलेल्या गझलांना मागणीही वाढली होती. डॉ. बशीर बद्र उर्दूतले लोकप्रिय कवी. त्यांच्या अनेक गझला जगजितसिंग यांनी गायल्या. सुरुवातीला प्रत्येक अल्बममध्ये एखादी गझल डॉ. बद्र यांची असायची. 1987 मध्ये जगजितसिंग यांचा ‘पॅशन्स’ हा नवा अल्बम आला.
![]() |
Jagmohan to Jagjit Singh : a journey of Ghazals |
अगर हम कहें और वो मुस्कुरा दें
हम उनके लिए ज़िंदगानी लुटा दें
हर इक मोड़ पर हम ग़मों को सज़ा दें
चलो ज़िन्दगी को मोहब्बत बना दें
‘पॅशन्स’मधील जगजितसिंग आणि चित्रा यांच्या आवाजातील हे युगलगीत तर खूपच सुरेख. ऐकताना मन एकाग्र होतं. 1988 मध्ये ‘लाइव्ह इन कन्सर्ट’ या अल्बमनंतर त्याच वर्षी ‘बियाँड टाइम’ आला. ‘बियाँड टाइम’ भारतातला पहिला डिजिटल अल्बम होता. त्याचे रेकॉर्डिंग लंडनमधील जेकब्स स्टुडिओत झाले होते. या अल्बमने तर अनेकांवर मोहिनी घातली. त्यातील गझलांनी तर अक्षरशः वेड लावलं होतं.
अपनी आग को ज़िंदा रखना कितना मुश्किल है
पत्थर बीच आईना रखना कितना मुश्किल है
जगजितसिंग आणि चित्रासिंग यांचा हा सुवर्णकाळ होता. त्या वेळी गझलांचा सुपरस्टार म्हणून जगजितसिंग यांचा लौकिक होता.
‘बियाँड टाइम’मध्ये आधुनिक वाद्यांचा प्रयोग केला होता. गिटार, ऑक्टोपॅड, पियानो आणि कीबोर्डचा प्रथमच उपयोग केला होता. 1989 मध्ये ‘डिझायर’ हा अल्बम आला.
दिन आ गए है शबाब के आँचल संभालिए
होने लगी है शहर में हलचल संभालिए
अशा अनेक गझला डिझायरने लोकप्रिय केल्या. जगजितसिंग आणि चित्रा यांचं आयुष्य छान सुरू होतं. जणू ही विश्वातली सर्वांत सुंदर जोडी आहे. सोबतीला विवेक आणि मोनिकाची गोड सोबतही होतीच. या कुटुंबाच्या आयुष्यातच एक सुरीलेपण होतं. एक प्रकारची लय होती. सूर जुळले, की सुख परमोच्च स्थानी जातं. सगळं काही छान सुरू असताना काय कोणास ठाऊक, या कुटु्ंबावर मोठा आघात झाला. सुरमयी आयष्याचे गाणे छान सुरू असताना सतारीची तार तुटावी तसाच काहीसा प्रसंग त्यांच्या आयुष्यावर गुदरला. 28 जुलै 1990 ही त्यांच्या आयुष्यात एक काळरात्र आली. ऐन तारुण्यात त्यांचा 18 वर्षांचा मुलगा विवेकचा अपघातात मृत्यू झाला. हा आघात जगजितसिंग आणि चित्रा यांच्या सहनशक्तीपलीकडचा होता. कारण विवेक अशा ठिकाणी गेला, जिथून तो परत कधीच येणार नव्हता. येत होत्या फक्त आठवणी. जगजितसिंग यांनी अनेक संकटे झेलली होती. मात्र, काळजाचा तुकडा असलेल्या विवेकच्या मृत्यूने ते कोलमडले. हसत्याखेळत्या घरात स्मशान शांतता पसरली होती.
![]() |
Jagmohan to Jagjit Singh : a journey of Ghazals |
एक आह भरी होगी हमने ना सुनी होगी
जाते जाते तुमने आवाज़ तो दी होगी
हर वक़्त यही है ग़म, उस वक़्त कहाँ थे हम
कहाँ तुम चले गए
चिठ्ठी न कोई संदेस जाने कौन से देश
जहाँ तुम चले गए
ही गझल मग हेलावून टाकते. पुत्रवियोगानंतर जगजितसिंग आणि चित्रा यांनी गायकीतून अंगच काढून घेतले. त्यांना आता मुलगी मोनिकाचाच | Monica | आधार उरला होता. असं असलं तरी विवेकची जागा कोणीही भरून काढू शकलं नाही. घराची घडी विस्कटली होती. असं म्हणतात, की काळ उणीव भरून काढतो. पण ही पोकळी अशी निर्माण झाली होती, की ती भरून निघालीच नाही. चित्रा यांना इतका सद्मा बसला होता, की त्या निःशब्द झाल्या. तोंडातून शब्द फुटत नव्हते. गळ्यातून सूर उमटणे ही तर दूरची गोष्ट. 28 जुलै 1990 च्या काळरात्रीनंतर चित्रा यांना कोणीही गाताना पाहिलं नाही. जगजितसिंग यांनीही दोन महिने गाणे सोडले होते. मात्र, स्वतःला सावरत ते पुन्हा गाऊ लागले. यापूर्वी त्यांच्या दर्दभऱ्या गझलगायकीत वेदना होती. आता जगजितसिंग स्वतःच वेदनेने व्याकुळ होऊन गाताना दिसत होते. काही वेळा ते इतके भावनिक व्हायचे, की कार्यक्रमात काही वेळा ते ब्रेक घ्यायचे. नंतर मोठ्या हिमतीने स्वतःला सावरत पुन्हा तानपुरा जवळ करायचे. हा कठीण काळ त्यांनी पचवला आणि 1990 मध्ये त्यांचा नवा अल्बम आला- ‘समवन समव्हेअर.’ अर्थात, या अल्बमचे आधीच रेकॉर्डिंग झाले होते. मात्र प्रदर्शित केलेला नव्हता. अचानक विवेकच्या | Vivek | मृत्यूनंतर तो लांबणीवर पडला होता.
जगजितसिंग यांच्या आवाजातला गोडवा आणखी वाढला. पुत्रवियोगाने ते काहीसे खचल्याची चिन्हे स्पष्टपणे जाणवत होती. यापूर्वी त्यांच्या आवाजात तारुण्य आणि कारुण्य पाहायला मिळायचे. आता फक्त कारुण्य उरले होते. तारुण्य अचानक प्रौढत्वाकडे गेले. त्यांचा कल आध्यात्मिकतेकडेही वाढला होता.
![]() |
Jagmohan to Jagjit Singh |
आज्ञा पई अकाल दी, तबे चलायो पंथ, सब सिखन को हुक्म है गुरु मानयो ग्रंथ…
भक्तिरसात ते लीन झाले होते. स्वतःला सावरत पुन्हा त्यांनी गझल, भजन, नज्म, गीतांची गंगा चाहत्यांपर्यंत आणली.1990 नंतर पुन्हा अल्बम आले.
उसको रुखसत तो किया था मुझे मालूम न था
सारा घर ले गया घर छोड़ के जाने वाला…
1991 मध्ये ‘होप’ | Hope | हा अल्बम आला. त्यानंतर ‘कहकशाँ’ हा अल्बम आला. हा दूरदर्शनवरील मालिकेवर आधारित होता. हा त्यांच्या अनेक अल्बमपैकी सर्वांत उत्तम अल्बम मानला जातो. अली सरदार जाफरी यांनी कहकशाँची | Kahkashan | जबाबदारी सांभाळली होती. यात हसरत मोहानी, मजाज लखनवी, फिराक गोरखपुरी, मखदूम, जिगर मोरादाबादी, जोश मिलिहाबादी या उर्दूतील निवडक कवींची शायरी समाविष्ट होती. जोश मिलिहाबादींची एक गझल तर जगजितसिंगच्या आवाजात अजरामर झाली.
सब की झोली मेरी झोली,
सब की टोली मेरी टोली,
सब की होली मेरी होली,
सब की बोली मेरी बोली,
सब का जीवन मेरा जीवन।
बोल इक तारे झन झन झन झन
![]() |
Chitra Singh ghazals |
‘कहकशाँ’मधील | Kahkashan | एक गझल चित्रा यांच्या आवाजातलीही होती. ही गझल विवेकच्या मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केली गेली होती. याच काळात 1991 मध्ये ‘व्हिजन’ | Vision |हा अल्बमही लोकप्रिय झाला. संथ वाहणाऱ्या नदीसारखे त्यांचे सूर चाहत्यांचे मन समृद्ध करीत गेले. 1992 मध्ये ‘सजदा’ अल्बम आला. हा अल्बम लता मंगेशकर यांच्यासोबत होता. गझलविश्वातला हा पहिलाच प्रयोग होता. त्यानंतर याच वर्षी आणखी एक धमाकेदार अल्बम आला- ‘इन सर्च.’ 1993 मध्ये ‘इनसाइट’… | Insight |जगजितसिंग यांनी दरवर्षी वेगवेगळे अल्बम चाहत्यांसाठी आणले. यात जुन्या रचना होत्या, काही धार्मिक होते, तर काही चित्रपटगीते. 1994 मध्ये ‘फेस टु फेस’ | Face to Face |, 1995 ‘क्राय फॉर क्राय’ | Cry For Cry |, 1996 ‘युनिक’ | unique album |, ‘मिराज’ | Mirage |, 1997 मध्ये ‘लव्ह इज ब्लाइंड’ | Love Is Blind |, 1998 ‘सिलसिले’, 1999 ‘मरासिम’ | Marasim |, नंतर ‘दिल कहीं होश कहीं’, ‘नई दिशा’, ‘अ जर्नी’, ‘सहर’, ‘आइना’…अशा अनेक अल्बममधून जगजितसिंग चाहत्यांचे समाधान करीत गेले.
मुझसे बिछड़ के खुश रहते हो
मेरी तरह तुम भी झूठे हो
इक टहनी पे चाँद टिका था
मैं ये समझा तुम बैठे हो
2001 मध्ये ‘डिफरंट स्ट्रोक’, ‘सोझ’, ‘लाइफ स्टोरी’, 2002 मध्ये ‘फर्गेट मी नॉट’, ‘संवेदना’…’संवेदना’ हा दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित अल्बम आहे. 2003 मध्ये ‘क्लोज टू माय हार्ट’, ‘शिवा’, 2004 मध्ये ‘मुंतझिर’ असे एकापाठोपाठ त्यांचे अल्बम आले नि लोकप्रियही झाले.
रात बैठी है बाहें पसारे
सिसकियां ले रहे है सितारे
कोई टुटा हुआ दिल पुकारे
हमदम तू कहाँ है…
2005 मध्ये ‘बेस्ट ऑफ जगजित आणि चित्रा’, ‘तुम तो नहीं हो’, 2009 मध्ये ‘इन्तेहां’ असे अनेक अल्बम आले. जगजितसिंग गझल आणि गझलकारांची निवड स्वतःच करायचे. गझल ते इतके परखून घ्यायचे, की जोपर्यंत त्यांचे समाधान होत नाही, तोपर्यंत ती गझल त्यांच्या अल्बममध्ये जागा मिळवू शकत नव्हती. 2012 मध्ये ‘तेरा बयान गालिब’, ‘दि मास्टर अँड हिज मॅजिक’ हे त्यांचे अखेरचे अल्बम ठरले. अर्थात, हे दोन्ही अल्बम त्यांनी जगाला अलविदा केल्यानंतर आले.
Next last 8th part here…
Jagmohan to Jagjit singh (part 8) : जगजितसिंग यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले…
क्रमशः
Extensively written..
Thank you so much
plz subscribe n follow me also
Very well wrote dear friend Mahesh
Thank you so much 🙂