![]() |
गर्भवती असतानाही या महिला खेळाडूंनी ऑलिम्पिक, तसेच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभाग घेतला |
गर्भारदिव्य!
खेळाविषयी पॅशन असणं म्हणजे काय, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सेरेना विल्यम्स. दोन महिन्यांची गर्भवती असताना सेरेनाने आपलीच मोठी बहीण व्हीनसला हरवत जानेवारी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. सेरेना एकमेव नाही, जिने गर्भवती असताना स्पर्धा खेळली. अशा अनेक महिला आहेत, ज्यांनी गर्भवती असताना विजिगीषू वृत्तीचं प्रदर्शन केलं. अशाच काही लढावू खेळाडूंविषयी…
महेश पठाडे
rhythm00779@gmail.com
mob. 8087564549
सामान्यपणे एखादी महिला गर्भवती राहिली तर केवढी काळजी घेतली जाते! जड उचलू नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको. काळजी घे… वगैरे वगैरे. आणि एवढं सगळं करूनही त्रास, वेदना होत असल्याची तक्रार कमी होत नाही. काही महिला खेळाडूंचा गर्भधारणा सोहळा याच्या एकदम उलट असतो. अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर गेल्याच आठवड्यात तिने सोशल मीडियावर स्विमसूटमधला एक फोटो पोस्ट केला आणि त्यावर एक कॅप्शन दिली… ‘२० वीक्स.’ म्हणजे ज्या वेळी ती ऑस्ट्रेलियन ओपनचा (जानेवारी २०१७) अंतिम सामना खेळत होती, त्या वेळी ती आठ आठवड्यांची गर्भवती होती. ३५ वर्षीय सेरेनाने टेनिस कोर्टवर कारकिर्दीतले २३ वे ग्रँड स्लॅम जिंकून एक प्रकारे गर्भधारणेचा सुरुवातीचा काळ अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट केला. विशेष म्हणजे अंतिम फेरीतला सामना जिंकताना सेरेनाने एकही सेट गमावला नाही. याला म्हणतात खेळाविषयीचं पॅशन! पुढच्या आठवड्यात ती जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणार आहे. महिला टेनिस असोसिएशनच्या विशेष नियमानुसार, सेरेना जर १२ महिन्यांच्या आत कोर्टवर पुन्हा परतली तर तिच्यासाठी हे अव्वल स्थान राखून ठेवले जाणार आहे. एकूणच टेनिसविश्वात हे ग्रँड स्लॅम सेरेनाच्या नावावर सुवर्णाक्षरात नोंदले जाईल. अर्थात, सेरेना एकमेव खेळाडू नाही, जिने गर्भवती असताना स्पर्धा खेळली. अशा अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी गर्भवती असताना महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या.
मलेशियातील नूर सूर्याणी तैबी आठ महिन्यांची गर्भवती असताना २०१२ मधील लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत शूटिंग प्रकारात सहभागी झाली होती. अत्यंत खडतर स्पर्धा खेळूनही त्यांच्या गर्भाला मात्र कोणतीही इजा झाली नाही हे विशेष. एका गर्भवतीने ८०० मीटर शर्यत जिंकली, तर एकीने वेगवान शारीरिक हालचालींच्या बीच व्हॉलिबॉल खेळात ऑलिम्पिक सुवर्ण जिंकले. हे सगळंच अनपेक्षित आणि अविश्वसनीय आहे. कारण ओटीपोटाला जोराचा धक्का बसला तरी मूल गमवावे लागेल, नाही तर जिवावर बेतणारा प्रसंग तरी उद््भवण्याचा धोका असतो. मात्र, हा धोका पत्करून स्पर्धा खेळण्याचं धाडस करणाऱ्या सेरेनासारख्या महिला खेळाडू म्हणजे शूर सेनानीच म्हणाव्या लागतील.
![]() |
Pregnant Runner : अमेरिकेची अॅलिसिया माँटेनो 34 महिन्यांची गर्भवती असताना 800 मीटर शर्यतीत धावली. |
सात महिन्यांची गर्भवती धावली 800 मीटर
अॅथलेटिक्समधील जून २०१४ ची ही अविश्वसनीय घटना. अमेरिकेची ऑलिम्पिक धावपटू अॅलिसिया माँटॅनो (Alysia Montano) ३४ आठवड्यांची गर्भवती असताना तिने अमेरिकेच्या ट्रॅक अँड फिल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभाग घेतला. कॅलिफोर्नियाच्या हॉर्नेट स्टेडियमवर झालेली ही शर्यत अॅलिसियाने २ मिनिटे ३१.१३ सेकंदांनी जिंकली. २०१० मध्ये नोंदविलेल्या सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा विक्रम अवघ्या ३५ सेकंदांनी हुकला. मात्र, तिने तिच्या प्रतिस्पर्ध्यांना तब्बल १२० मीटरने मागे टाकले होते हे विशेष. जेव्हा तिने ही स्पर्धा पूर्ण केली तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. या पराक्रमाला काय म्हणावे?
![]() |
Pregnant Valleyball player : अमेरिकेची केरी वॉल्श जेनिंग्स गर्भवती असताना ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाली होती. |
गर्भवतीने जिंकले ऑलिम्पिक सुवर्ण
२०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमधील बीच व्हॉलिबॉल स्पर्धेत अमेरिकेची खेळाडू केरी वॉल्श-जेनिंग्स (Kerri Walsh Jennings) हिने सुवर्णपदक जिंकले. ही स्पर्धा खेळली तेव्हा केरी पाच आठवड्यांची गर्भवती होती. अर्थात, हे तिचं तिसरं अपत्य होतं. म्हणजे दोन मुलांनंतर तिने तितक्याच त्वेषाने ही स्पर्धा जिंकली, जेवढ्या त्वेषाने ती लग्नापूर्वी खेळत होती. बीच व्हॉलिबॉलमध्ये बॉल स्मॅश करताना पदोपदी उडी घ्यावी लागते आणि अनेकदा शरीर झोकून द्यावे लागते. अर्थातच ही झेप घेताना पोटाला धक्का बसणारच. ‘‘मात्र, जसजसे मी शरीर झोकून देत होते तसतसे मी गोल्ड मेडलच्या अधिक जवळ जात होते. मला माझ्या देशाला गोल्ड मिळवून द्यायचे होते,’’ असं केरी अभिमानाने सांगते.
![]() |
Pregnant surfer : अमेरिकेची सर्फर बेथानी हॅमिल्टन सहा महिन्यांची गर्भवती असतानाही सर्फिंग करायची. |
सर्फरवर गर्भवतीचे कारनामे
बेथानी हॅमिल्टन (Bethany Hamilton). सर्फिंग खेळातील अमेरिकेतील एक लढावू महिला. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी २००३ मध्ये सकाळी नेहमीप्रमाणे सर्फिंगचा सराव करताना शार्कच्या हल्ल्यात तिने डावा हात कायमचा गमावला. मात्र, समुद्री लाटांचीही तमा न बाळगणारी बेथानी हार मानणाऱ्यांतली नव्हतीच. तिने सर्फिंगमध्ये मोठ्या कष्टाने कमबॅक केलं. बोर्डवर तितक्याच दमदारपणे तोल सांभाळत ती लीलया सर्फिंग करू लागली. २०१५ मध्ये सहा महिन्यांची गर्भवती असतानाही ती न डगमगता सर्फिंग करत होती. बेथानीने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, की ‘‘ओशनमध्ये सर्फिंग करताना माझा तो विलक्षण अनुभव होता, जेव्हा माझं मूल पोटात गोल गोल फिरायचं!’’
![]() |
MMA : पोटावर ठोसे झेलत किनबर्ली नोव्हाज मार्शल आर्ट स्पर्धेत खेळली, जेव्हा ती गर्भवती होती. |
गर्भवतीचा ब्राझिलियन ठोसा
ब्राझीलची मिक्स्ड मार्शल आर्ट (एमएमए) खेळाडू किनबर्ली नोव्हाज (Kinberly Novaes) हिने १२ आठवड्यांची गर्भवती असताना स्पर्धा जिंकली. तिचं हे धाडस धक्कादायकच म्हणावं लागेल. तत्पूर्वी, एमएमए हा खेळ समजून घेतला तर किनबर्लीच्या यशासमोर तुम्ही नतमस्तकच व्हाल. एमएमए या खेळात मुक्तपणे लथ्थाप्रहार आणि कंबरेच्या वर कुठेही ठोसा लगावण्याची मुभा असते. म्हणजे पोटावर ठोसा किंवा लथ्थाप्रहार सहजपणे होतो. काही वेळा प्रतिस्पर्ध्याचा एक ठोसा जिवावर बेतूही शकतो. अनेक खेळाडू रक्तबंबाळ झालेलेही पाहायला मिळतात. किनबर्ली अशा या खेळात गर्भवती असताना जिंकली. विशेष म्हणजे गर्भवती असल्याचं तिला स्पर्धेनंतर कळलं. तत्पूर्वी तिने पोटावर अनेक ठोसे झेलले होते. स्ट्रॉवेट गटात (४८ ते ५२ किलो) ती खेळत होती. तिला जाणवले, की आपले वजन कमीच होत नाही. आहार संतुलित असतानाही असं का होतं? जेव्हा ती डॉक्टरकडे गेली तेव्हा तिला गर्भवती असल्याचं कळलं… खेळाविषयीच्या या पॅशनला काय म्हणावं?
![]() |
Pregnant Golfer : इंग्लंडची लिझ यंग हिने गर्भवती असतानाही आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धेत सहभाग घेतला. |
गर्भवती गोल्फर
ही कहाणी आहे एका गोल्फरची. अगदी गेल्या वर्षी २०१६ मध्ये इंग्लंडची लिझ यंग (Liz Young) या महिला गोल्फपटूने आठ महिन्यांची गर्भवती असताना प्रतिष्ठेच्या रिको वूमेन ब्रिटिश ओपन गोल्फ स्पर्धेत सहभाग घेत इतिहास रचला. पोटातील गर्भाची वाढ परिपक्व होत असताना लिझ स्पर्धेत उतरली. अशा अवस्थेत एकूण १८ खळग्यांमध्ये चेंडू ढकलणे सोपे मुळीच नाही. एक टी शॉट किमान १०० यार्ड तडकावा लागतो. ‘सामान्यपणे एका वेळी एक शॉट घेताना त्रास होत नव्हता. मात्र, जास्त शॉट घेताना पोटात दणका बसायचा. अखेर माझं शरीर मला सांगत होतं, की आता मला कुठे तरी थांबण्याची गरज आहे.’’ लीझ तिचा अनुभव सांगत होती. मात्र तरीही ती धीराने १२ खळगे पूर्ण करू शकली. गर्भवती अवस्थेत अद्याप असा पराक्रम कोणीही करू शकलं नाही. किंबहुना तसा विचारही कोणी करू शकणार नाही.
![]() |
आर्चरीची खेळाडू जर्मनीची कॉर्नेलिया पीफोल सात महिन्यांची गर्भवती असताना ऑलिम्पिक स्पर्धा खेळली. |
गर्भवतीचा ऑलिम्पिक लक्ष्यवेध
जर्मनीची कॉर्नेलिया पीफोल (Cornelia Pfohl) अशीच एक आर्चरीची खेळाडू. गर्भवती असताना तिने दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये जर्मनीचे प्रतिनिधित्व केले आहे. २००० मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ती गर्भवतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच सहभागी झाली होती. या स्पर्धेत तिने ब्राँझ मेडल जिंकले. २००४ मध्ये ती पुन्हा अथेन्स ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. या वेळी ती सात महिन्यांची गर्भवती होती. ती पदक मिळवू शकली नसली तरी तिच्या लढावू बाण्याने तिने मने मात्र जिंकली!
![]() |
अमेरिकेची एमिली जॅक्सन नऊ महिन्यांची गर्भवती असतानाही कयाकिंगची स्पर्धा खेळली |
नऊ महिन्यांची गर्भवती जिंकली कयाकिंग स्पर्धा
अमेरिकेतील इडाहो राज्यातील पायेट नदीत २०१३ मध्ये २३ वर्षीय एमिली जॅक्सनने (Emily Jackson) कयाकिंगची स्पर्धा जिंकली. त्या वेळी ती नऊ महिन्यांची गर्भवती होती. कयाकिंगचा इव्हेंट कोणी पाहिला असेल तर ही स्पर्धा गर्भवतीने खेळणे शक्यच नाही, असाच कयास कोणीही काढेल. कारण प्रचंड लाटांमध्ये अतिशय लहान बोटीतून स्पर्धा जिंकणे भल्या भल्यांना शक्य होत नाही. वेगाने आदळणाऱ्या लाटांमध्ये बोट हेलकावेच खात नाही, तर पाण्यात वर्तुळाकार फिरते. अशा वेळी तोल सांभाळत पुन्हा ती सरळ ठेवण्याचे कौशल्य कयाक खेळाडूच जाणो! एमिलीने ही स्पर्धा लीलया जिंकत सुवर्णपदक जिंकले.
लढावू महिला खेळाडूंची ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत, ज्यांनी नकळतपणे गर्भारपण मैदानावर सेलिब्रेट केले. धनुर्विद्या, बुद्धिबळ, कॅरम, एअर रायफल शूटिंग अशा काही खेळांमधील गर्भवती महिलांचा सहभाग एक वेळ मान्य केला, तरी ते सोपे मुळीच नाही. एकाग्रता भंगली, की सगळा डाव कोलमडतो. जेथे शरीराचा थेट संबंध येतो अशा खेळांमधील गर्भवती खेळाडूंचा सहभाग तर सामान्यांच्या कल्पनेच्याही पलीकडचा आहे. धावपटू अॅलिसिया माँटेनो, मार्शल आर्टची खेळाडू किनबर्ली नोव्हाज, बीच व्हॉलिबॉलपटू केरी वॉल्श जेनिंग्स आदी खेळाडूंच्या साहसाला तर शब्द नाहीत… त्यांच्यासाठी फक्त निःशब्द सॅल्यूट!