- चेस करिअर दावणीला
चेसमध्ये करिअर करण्यासाठी अनेकांनी आपलं आयुष्य वाहून घेतलं आहे. आंतरराष्ट्रीय मास्टर, ग्रँडमास्टरचे टायटल मिळवायचे असले तरी त्यासाठी तीन नॉर्म मिळवावे लागतात. ही स्पर्धा सर्वांत अवघड मानली जाते. त्यामुळेच जगभरात आतापर्यंत केवळ १,४४४ ग्रँडमास्टर होऊ शकले. यातील अनेक जण एव्हाना निवृत्तही झाले असतील. कारण जो नॉर्म मिळवायचा त्याला त्याच दर्जाच्या खेळाडूविरुद्ध लढावे लागते. आता असे खेळाडू किती आहेत? भारतात महिला आणि पुरुष मिळून केवळ ३० ग्रँडमास्टर आहेत. त्यामुळे ग्रँडमास्टर होणे सहजासहजी शक्य नाही. मग तो मिळविण्यासाठी स्पर्धांमागून स्पर्धा खेळत राहावे लागते आणि एका स्पर्धेचे प्रवेश शुल्क आठ हजार रुपयांच्या पुढे असते. दक्षिणेकडील मुले वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षापासूनच चेसकडे वळतात. आता महाराष्ट्रातही हाच ट्रेंड आला आहे. ही मुले शाळेत शेवटचे दोन-तीन महिने परीक्षेपुरती जातात हे आणखी धक्कादायक. जर ग्रँडमास्टर नॉर्म मिळाला नाही किंवा खेळात सातत्य राहिलं नाही तर चेस करिअर गमावण्याबरोबरच शैक्षणिक करिअरही वाया जातं. हा एक जुगारच आहे. सातत्याने स्पर्धा खेळायच्या तर अवाढव्य शुल्क हीच एकमेव अडचण नाही, तर तेथे राहण्याचाही खर्च वेगळा. या स्पर्धा परदेशात जास्त असतात. त्यामुळे ‘फिडे’ने किमान एंट्री फी कमी करायला हवी.
- गुणवत्तेत घसरण
‘फिडे’ने आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे रेटिंग १००० पर्यंत खाली आणले आहे. यामुळे गुणवत्तेत मोठी घसरण होणार आहे. दहा वर्षांपूर्वी फिडे रेटिंग मिळविणाऱ्या खेळाडूचा दर्जा सामान्य खेळाडूंपेक्षा खूपच वरचा असायचा. त्या वेळी नऊ रेटेड खेळाडूंमध्ये किमान तीन गुण मिळविणे आवश्यक होते. त्यामुळे रेटेड खेळाडूविरुद्ध जिंकणे इतके अवघड होते, की किमान रेटिंगसाठी तीन स्पर्धा तरी खेळाव्या लागायच्या. जो हे अग्निदिव्य पार करेल त्याला २००० पर्यंत कमीत कमी रेटिंग मिळायचे. यात थोडासा बदल करत ‘फिडे’ने नवात दीड गुण केले. आता ‘फिडे’ने पाच खेळाडूंविरुद्ध किमान अर्धा गुण केला आहे. हा निर्णय भारतात यंदा जुलैत लागू झाला आहे. या रेटिंगला काहीही अर्थ उरलेला नाही. आता जो रेटेड खेळाडू असेल त्याला सामान्य खेळाडूही सहज हरवू शकेल. मेरिट गेम म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या खेळात या निर्णयामुळे मेरिटच राहिले नाही. यात ‘फिडे’चीच प्रतिष्ठा जाणार आहे हे निश्चित.
- लोकाश्रयापासून दूर
नव्वदी पूर्ण करणारी ‘फिडे’ अजूनही बुद्धिबळाला लोकाश्रय मिळवून देऊ शकलेली नाही. भलेही तो पावणेदोनशे देशांत खेळला जात असेल. एरव्ही अन्य खेळांच्या स्पर्धा आवडीने पाहिल्या जातात. बुद्धिबळ मात्र खेळाडूव्यतिरिक्त कोणालाही पाहण्यात इंटरेस्ट नाही. मुळात हा खेळ पिनड्रॉप सायलेन्स असला तरी तो पब्लिक गेम कसा होऊ शकेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. रटाळपणा या खेळाने कमी केला असला तरी तो इतरांसाठी एंटरटेन्मेंट होऊ शकेल या दिशेने कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. आंतरराष्ट्रीय आर्बिटर राजेंद्र शिदोरे यांनी, या खेळात कॉमेंट्री असावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जोपर्यंत मार्केटिंग होत नाही तोपर्यंत चेस पब्लिक गेम होणार नाही, असे मत त्यांनी नोंदवले आहे.
भारतीय बुद्धिबळाची स्थिती
- देशभरात केवळ 30 ग्रँडमास्टर आहेत. महाराष्ट्रात केवळ चार ग्रँडमास्टर आहेत. यात नाशिकचा विदित गुजराथी याच्यासह अक्षयराज कोरे, प्रवीण ठिपसे, अभिजित कुंटे यांचा समावेश आहे. शार्दुल गागरे ग्रँडमास्टर होण्याच्या वाटेवर असून, या टायटलपासून केवळ एक नॉर्म दूर आहे.
- भारतातील टॉप टेन खेळाडूंमध्ये माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद पहिल्या स्थानावर, तर नाशिकचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी नवव्या स्थानावर आहे. यात कोनेरू हम्पी या एकमेव महिला खेळाडूने स्थान मिळविले असून, ती सातव्या स्थानावर आहे.
- टॉप टेन महिला खेळाडूंमध्ये कोनेरू हम्पी पहिल्या, तर महाराष्ट्राची ईशा करवडे सहाव्या स्थानावर आहे.
- अंध बुद्धिबळ खेळाडूंमध्ये कर्नाटकचा किशन गांगुली पहिल्या, तर महाराष्ट्राचा चारुदत्त जाधव तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या दहा खेळाडूंमध्ये महाराष्ट्राचे पाच खेळाडू आहेत.
- विश्वनाथन आनंदने क्लासिकल प्रकारात पाच वेळा (२०००, २००७, २००८, २०१०, २०१२) विश्वविजेतेपद मिळविले आहे, तर २००० मध्ये ब्लिट्झ (अतिजलद बुद्धिबळ) व २००३ मध्ये रॅपिड (जलदगती) प्रकारात विजेतेपद मिळविले आहे. अशी कामगिरी करणारे जगात दोनच खेळाडू आहेत. आनंदनंतर केवळ मॅग्नस कार्लसनच ही कामगिरी करू शकला आहे.
जागतिक बुद्धिबळाच्या पटावर भारत
- जुलै २०१४ च्या जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत पुरुषांमध्ये रशिया पहिल्या, तर भारत सातव्या स्थानावर आहे. महिलांमध्ये चीन पहिल्या, रशिया दुसऱ्या, तर भारत पाचव्या स्थानावर आहे.
- जुलै २०१४ मध्ये ‘फिडे’ने जाहीर केलेल्या जगातल्या टॉप टेन खेळाडूंमध्ये भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद हा एकमेव खेळाडू असून, तो सातव्या स्थानावर आहे. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन पहिल्या स्थानावर आहे.
- ‘फिडे’ने जाहीर केलेल्या जागतिक महिला खेळाडूंच्या पहिल्या १५ खेळाडूंमध्ये कोनेरू हम्पी आणि द्रोणावली हरिका या दोन खेळाडूंनी स्थान मिळविले आहे. कोनेरू तिसऱ्या, तर द्रोणावली १३ व्या स्थानावर आहे.
- जुलै २०१४ च्या जागतिक युवा (२१ वर्षांखालील वयोगट) खेळाडूंच्या पहिल्या २० खेळाडूंमध्ये नाशिकचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी हा एकमेव भारतीय खेळाडू १६ व्या स्थानावर आहे. महिला खेळाडूंमध्ये महिला ग्रँडमास्टर पद्मिनी राऊत ही एकमेव भारतीय खेळाडूही १६ व्या स्थानावर आहे.
Published on Maharashtra Times : 20 July 2014