![]() |
Golden memories of world cup kabaddi 2016 |
Golden memories of world cup kabaddi 2016 |
अव्वल कबड्डीपटू अजय ठाकूर आणि अनुप कुमारने 2016 मधील विश्वकप कबड्डी स्पर्धेतील अशा काही आठवणींना उजाळा दिला, ज्या वेळी भारताने अंतिम फेरीत इराणला पराभूत केले होते. या विजयासह भारताने विश्वकरंडक जिंकण्याची हॅटट्रिकही साधली होती. अहमदाबादमध्ये २२ ऑक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने इराणला ३८-२९ असे पराभूत केले होते. सलग तिसऱ्यांदा भारत विश्वविजेता ठरला होता. भारताने यापूर्वी 2004 आणि 2007 मध्ये विश्वकरंडक कबड्डी स्पर्धा जिंकली आहे. मात्र, चौथ्यांदा विश्वकरंडक उंचावण्याचे भारताचे स्वप्न धूसर झाले आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे करोना विषाणूचा संसर्ग. पुन्हा ही स्पर्धा होण्याची शक्यता धूसर झाली आहे. मात्र, या निमित्ताने २०१६ च्या विश्वकरंडक कबड्डी स्पर्धेला नव्याने उजाळा मिळणार आहे. कारण ही स्पर्धा तुम्हाला ‘स्टार स्पोर्ट्स’वर star sports | २० ते २४ एप्रिल २०२० दरम्यान पुन्हा पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने विश्वकरंडक स्पर्धेतील भारताविरुद्धचे सर्व सामने ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याची संधी आहे. त्या निमित्ताने या स्पर्धेतील अंतिम फेरीला दिलेला हा उजाळा….
कबड्डीची ती विश्वकरंडक स्पर्धा आजही भारतीयांच्या स्मरणात असेल. ज्या वेळी भारत आणि इराण अंतिम फेरीत पोहोचले होते, त्या वेळी दोनच अटकळे बांधली जात होती. ती म्हणजे भारत हॅटट्रिक साधणार का, इराण पुन्हा विश्वविजेता होणार का? प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा हा सामना सुरू झाला आणि कबड्डीप्रेमी श्वास रोखून हा सामना पाहू लागले. प्रत्येक खेळामध्ये चुरशीचे सामने विशिष्ट देशांमध्येच पाहायला मजा येते. उदाहरणार्थ, क्रिकेट, हॉकीमध्ये भारत-पाकिस्तान, फुटबॉलमध्ये ब्राझील-फ्रान्स, तसं कबड्डीमध्ये भारत-इराण हा सामना याच दोन देशांमध्ये पाहायला मजा येते. कारण जगभरात कोणताही आंतरराष्ट्रीय कबड्डी सामना आतापर्यंत याच दोन देशांमध्ये रंगला आहे. त्यामुळेच अहमदाबादचे ट्रांस स्टेडिया प्रेक्षकांनी खचाखच भरलेले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन वेळा रौप्य पदक जिंकणारा इराणी संघ ऐन भरात होता. कारण त्यांनी उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचे आव्हान 28-22 असे संपुष्टात आणले होते, तर गतविजेत्या भारतानेही उपांत्य फेरीत थायलंडचे आव्हान ७३-२० असे मोडीत काढले होते. कबड्डी भारताच्या नसानसांत भिनलेली का आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा दणदणीत विजय होता.
विश्वकरंडक कबड्डी स्पर्धेत भारताला विजय मिळविणे सोपे नव्हतेच. कारण अ गटात पहिल्याच सामन्यात भारताला कोरियाने पराभूत केले होते. गतविजेत्यांसाठी हा इतका धक्कादायक पराभव होता, की कबड्डीप्रेमीही काही काळ स्तब्ध झाले असतील. कारण विश्वकरंडक कबड्डी स्पर्धेत विजयी अभियान सुरू करणाऱ्या भारताला पहिल्याच सामन्यात दक्षिण कोरियाने पराभूत केले होते. सुदैवाने भारतीय संघ यातून खचला नाही, तर त्वेषाने उठला आणि पुढचे सर्व सामने एकतर्फी जिंकत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. भारताने साखळीतल्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर समोर येईल त्या संघाला दणदणीत पराभूत करण्याचेच जणू ठरवले होते. ऑस्ट्रेलियाला 54-20, बांग्लादेशला 57-20, अर्जेंटिनाला 74-20, तर इंग्लंडला 69-18 असे दणदणीत पराभूत केले. एकाही प्रतिस्पर्धी संघाला २० पेक्षा अधिक गुण घेता आले नाहीत. आता या दिग्विजयी संघासमोर आव्हान होते इराणचे. ताकदीने भारतापेक्षा इराण उजवा होता. अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळल्याने इराणकडे कौशल्यही कमी नव्हते. आतापर्यंत जेवढे सामने झाले त्यात भारताला इराणनेच कडवी लढत दिली आहे.
फार लांब जायचे कारण नाही. २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धाच पाहा ना… कोणीही विसरणार नाही हा सामना. ही इतकी काटा लढत होती, की इराणने भारताचा अक्षरश: घाम फोडला होता. नशीब भारताने अखेरची रेड टाकल्यानंतर ही लढत २७-२५ अशी निसटती जिंकली आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपदावर नाव कोरले. २०१० ची आशियाई क्रीडा स्पर्धाही अशीच चुरशीची झाली होती. त्यामुळे भारताला गाफील राहून चालणार नव्हते. त्या वेळी भारतीय कर्णधार अनुप कुमारलाही ही कल्पना होतीच.
इराणला या स्पर्धेचा विश्वविजेतेपदाचा दावेदार मानले जात होते. त्याची दोनच कारणे होती. ती म्हणजे या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ नव्हता, तर ज्याचे कडवे आव्हान होते, तो बांग्लादेश ढेपाळलेला होता. त्यामुळे इराणशिवाय मजबूत संघ दुसरा नव्हता. दक्षिण कोरियाकडून धक्कादायक विजयाची अपेक्षा केली जात असली तरी ते आव्हान पेलण्याइतपत इराण मजबूत होता. असं असलं तरी इराण कधी कधी बेभरवशी संघही ठरला आहे. तुम्ही कबड्डीत पोलंड संघाचं नाव ऐकलंय का? अजिबात नाही ना! पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच पोलंड संघाकडून इराण गटातल्या सामन्यात पराभूत झाला होता. उपांत्य फेरीतही इराणला अपेक्षेप्रमाणे कोरियाकडून कडवी लढत मिळाली. मात्र कोरियाचे आव्हान मोडीत काढत इराणने अखेर भारताविरुद्ध आव्हान उभे केले होते. इराणचा कर्णधार भारताविरुद्धच्या सामन्यात प्रचंड सावध होता.
“आम्ही सज्ज आहोत. आम्हाला माहीत आहे, की उपांत्य फेरीत आमचा सामना भारताशी होणार आहे. भारताने मोठ्या फरकाने थायलंडला धूळ चारली. त्यामुळे आम्ही सावध असून, या भारताचे आव्हान मोडीत काढण्यासाठी आम्ही पूर्णत: संज्ज आहोत.” – मेराज शेख, कर्णधार, इराण
भारताकडे अजय ठाकूर, परदीप नरवाल आणि राहुल चौधरीसारखे उत्तम चढाईपटू, सुरेंद्र नाडा, सुरजित आणि मंजित चिल्लरसारखे बचावपटू होते. कर्णधार अनुप कुमारची अष्टपैलू खेळीने संघ मजबूत होता. दुसरीकडे इराणचंही पारडं हलकं नव्हतं. इराणकडे अबुलफजल मकसुदलू आणि मेराज शेखसारखे उत्तम चढाईपटू होते. कर्णधार फजल अत्राचली पकड करण्यात वाकबगार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणतेही भाकीत करणे धाडसीच होते. हा सामना अजय ठाकूर विरुद्ध फजल अत्राचली असाच होता. कारण दोघांच्या नेतृत्वाची कसोटी यात लागणार होती.
![]() |
world cup kabaddi 2016 |
अहमदाबादच्या ट्रास स्टेडियामध्ये रंगलेल्या या लढतीने कबड्डीप्रेमी सुखावले असतील. इराणने भारताला लौकिकाप्रमाणे कडवी लढत दिली. मात्र, त्यांना ३८-२९ असा ९ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला आणि भारताने सलग तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. अहमदाबादमधील ट्रांस स्टेडियावर 22 ऑक्टोबर 2016 रोजी जिंकलेला हा सामना सुवर्णाक्षरात नोंदला गेला. कारण विश्वविजेतेपदाची कामगिरी भारताने नोंदवली होती.
‘‘हा विजय अद्भुत होता. प्रेक्षकांचे आम्हाला प्रचंड प्रोत्साहन मिळत होते. या सामन्यातील अनुभव मी कधीही विसरू शकत नाही. मला विश्वास होता, की आम्ही जिंकणारच. संपूर्ण स्पर्धेत इराणची कामगिरी उत्तम होती. सामन्यागणिक ते उत्तम कामगिरी करीत होते. असे असले तरी आम्ही मागील काही सामन्यांत त्यांच्याविरुद्ध जिंकलो होतो. मी सुरुवातीपासून उत्तम चढाईपटूंना प्राधान्य दिले होते. अजय ठाकूरने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले होते.’’ – अनुप कुमार, कर्णधार, भारतीय संघ
भारतीय कर्णधाराची ही आठवण या सुवर्णक्षणांना उजाळा देत होते. हा सामना ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचे भाग्य ज्यांना मिळाले नसेल त्यांना ते पुन्हा मिळणार आहे. कारण ‘स्टार स्पोर्ट्स’वर 20 ते 24 एप्रिलदरम्यान या सामन्याचे पुन:प्रक्षेपण होणार आहे. तेव्हा हे सुवर्णक्षण पुन्हा अनुभवण्याची तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. तेव्हा पाहायला विसरू नका.