मैदानावरील पंचांकडून दिला जाणारा सॉफ्ट सिग्नल (Soft Signal)चा नियम रद्द करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे. या नियमाबाबत अनेक तज्ज्ञांनी टीका केली होती. त्यावरून गोंधळही निर्माण होत होता. टीव्ही पंचांनाही निर्णय देताना अडचण येत होती. आयसीसीने आणखी दोन नवीन नियम केले आहेत. एक जून 2023 पासून बदल आणि नवीन नियम लागू होतील. भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान सात जून 2023पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत सुरू होणार आहे. त्यातही या नियमांचा वापर केला जाईल.
सॉफ्ट सिग्नल (Soft Signal) म्हणजे काय?
काही वेळा मैदानापासून अगदी काही इंच वरून क्षेत्ररक्षक झेल टिपत असतो. झेल अचूक घेतला आहे की नाही, याबाबत खात्रीने लगेच निर्णय देणे पंचांना शक्य नाही. उघड्या डोळ्यांनी लगेचच पंचांना झेल अचूक टिपला आहे की नाही हे दिसू शकत नाही. तरीही मैदानावरील पंच अनुमान लावून बाद किंवा ना-बादचा निर्णय देत असतो, पंचांच्या याच निर्णयाला ‘सॉफ्ट सिग्नल’ असे म्हटले जाते. आयसीसीच्या नियमानुसार, मैदानावरील पंचांना फलंदाज झेलबाद आहे की नाही, याबाबत (सॉफ्ट सिग्नल) निर्णय द्यावा लागतो. त्यानंतर हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपविला जातो. तिसरे पंच टीव्ही रिप्ले बघून निर्णय देतात. मात्र, काही वेळा वारंवार ‘रिप्ले’ बघूनही झेल अचूक टिपल्याची खात्री होत नाही. अशा वेळी तिसरे पंच, मैदानावरील पंचांनी दिलेला ‘सॉफ्ट सिग्नल’चा निर्णय कायम ठेवत असतात.
यामुळे सॉफ्ट सिग्नल बाद!
नुकत्याच एका क्रिकेट सामन्यात सॉफ्ट सिग्नल (Soft Signal) नियमावरून बराच वाद झाला होता. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यादरम्यान हा वाद उफाळला होता. त्या वेळी बेन स्टोक्सने (Ben Stokes) सॉफ्ट सिग्नल नियमावर प्रश्न उपस्थित केले होते. झालं काय, की फलंदाज मार्नस लबुशेन याला सॉफ्ट सिग्नल नियमानुसार मैदानावरील पंचांनी झेलबादचा निर्णय दिला होता. मात्र, स्लिपमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूने हा झेल वादग्रस्त पद्धतीने पकडला होता. त्यानंतर मैदानावरील पंचांनी थर्ड अंपायरकडे दाद मागितली होती. मात्र, थर्ड अंपायरही बाद कसा झाला हे स्पष्ट करू शकले नाही. अशा वेळी थर्ड अंपायरला मैदानावरील पंचांच्या निर्णयासोबत जावे लागले.
सॉफ्ट सिग्नल नियमामुळे गोंधळाची भावना
सौरभ गांगुली यांच्या अध्यक्षतेखालील पुरुषांची क्रिकेट समिती आणि महिलांची क्रिकेट समितीने केलेल्या शिफारशींना मंजुरी मिळाल्यानंतर आयसीसीने सॉफ्ट सिग्नल नियम रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. त्यामुळे आता मैदानावरील पंचांना ‘सॉफ्ट सिग्नल’ (Soft Signal) बाद आहे की नाही, हा द्यावा लागणार आहे. मैदानातील पंच आता टीव्ही अंपायरशी चर्चा करून फलंदाजाला बाद द्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेतील. भारतीय संघाचे माजी कर्णधार असलेले गांगुली म्हणाले, ‘मागील काही वर्षांपासून सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयाबाबत चर्चा होत होती. मागील क्रिकेट समितीतही या निर्णयावर चर्चा झाली होती. या वेळीच्या बैठकीतही आम्ही यावर दीर्घ चर्चा केली. तेव्हा सॉफ्ट सिग्नलचा निर्णय अनावश्यक असल्याचे अनेकांचे मत पडले. या निर्णयामुळे गोंधळ होत असल्याची भावना आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.’
हेल्मेट सक्तीचाही निर्णय
आणखी एक नियम करण्यात आला आहे. तो म्हणजे, धोकादायक ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना खेळाडूने हेल्मेटचा वापर करणे सक्तीचे असणार आहे. जेव्हा फलंदाज वेगवान गोलंदाजाचा सामना करीत असतो आणि यष्टिरक्षक यष्ट्यांच्या जवळ उभा असतो, तेव्हा यष्टिरक्षकाने हेल्मेट घालणे सक्तीचे असणार आहे. त्याचबरोबर आक्रमक क्षेत्ररक्षक लावताना फलंदाजांभोवती क्षेत्ररक्षकांचे कडे केले जाते. फलंदाजांच्या जवळ क्षेत्ररक्षणासह उभ्या असलेल्या खेळाडूस हेल्मेट सक्ती असणार आहे. गांगुली म्हणाले, ‘खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीचा निर्णय आम्ही घेतला आहे.’ फ्री-हिटच्या निर्णयाबाबत किंचितसा बदल करण्यात आला आहे. जर फ्री-हिटदरम्यान चेंडू स्टम्पला लागला आणि फलंदाजाने धाव घेतली, तर ही धाव धावफलकात जोडली जाईल. म्हणजे फ्री-हिटदरम्यान चेंडू स्टम्पला लागून फलंदाज त्रिफळाबाद झाला, तरी धाव घेऊ शकतो.
नियमावर एक नजर…
- सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयाबाबत इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने शंका उपस्थित केली होती.
- जानेवारी 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी दरम्यान मार्नस लबुशेनला झेलबाद देण्यावरून असाच मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
- 2021 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी20 दरम्यानच्या लढतीत भारतीय संघाला या निर्णयाचा फटका बसला होता. तेव्हा कोहलीने थेट टीका केली होती.
- आयसीसी क्रिकेट समितीत गांगुली यांच्यासह माहेला जयवर्धने, रॉज हार्पर, डॅनिएल व्हिटोरी, व्ही.व्ही. एस. लक्ष्मण, जय शहा यांचा समावेश आहे.